ड्रेनेजच्या अपूर्ततेमुळे खोकरला 4 एकर कपाशी महिन्यापासून पाण्यात

साईड गटारींकडे दुर्लक्ष || शेतकर्‍यांचे नुकसान
ड्रेनेजच्या अपूर्ततेमुळे खोकरला 4 एकर कपाशी महिन्यापासून पाण्यात

भोकर |वार्ताहर| Bhokar

तालुक्यातील खोकर व भोकर परिसरात शासन रस्तादुरूस्ती साठी कोट्यावधी खर्च करतयं पण साईड गटारीकडे ठेकेदार व प्रशासन दोघांचंही दुर्लक्ष होत आहे. साईड गटार वाहती करून न दिल्याने गेल्या एक महिन्यापासून खोकर गावालगत असलेल्या भणगे कुटूंबातील चार शेतकर्‍यांची चार एकर कपाशी गेल्या महिन्यापासून पाण्यात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे.

गावालगत असलेले भणगे कुटूंबातील जयश्री भणगे, मंगल भणगे, श्रृती भणगे व श्रेणीक भणगे यांची चार एकर कपाशी करण्यात आली; परंतु लगत रस्ता रूंदीकरण व डांबरीकरणाचे काम झाले. संबधीत ठेकेदारांनी व प्रशासनाने साईडच्या गटारीकडे दुर्लक्ष केल्याने या शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत संबधीत शेतकर्‍यांनी सार्वजनीक बांधकाम खाते व तहसिलदार यांचेकडे लेखी तक्रार केलेली असतानाही कुठलीही कारवाई झालेली नाही.

भोकर स्टँडपासून श्रीक्षेत्र अडबंगनाथ देवस्थानकडे जाणारा रस्ता रूंदीकरण व डांबरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे; परंतू येथेही तशीच अवस्था आहे. येथेही भोकर व मुठेवाडगाव शिवेवर असलेल्या शेतकर्‍यांचे केवळ ड्रेनेज व्यवस्थीत न झाल्याने या शेतकर्‍यांची सोयबीन पाण्यात राहिल्याने या शेतकर्‍यांच्या हातची पिके गेली आहे. रस्त्याच्या कडेला गटारी खोदल्या; पण अनेक ठिकाणी चारी किंवा बांध आडवे आहेत.

प्रत्यक्षात जेथे पूर्वीचा सिडीवर्क नाही तेथे विनाकारण कुणाचे तरी ऐकून नळ्या टाकणे अयोग्य असतानाही गुगल नकाशाचा धाक दाखवुन शेतकर्‍यांना वेठीस धरले जात आहे. मुख्यमंत्री सडक योजनेच्या संबधीत अधिकार्‍यांनी साईड गटारी खोल करून ज्या त्या दिशेचे पाणी ज्या त्या दिशेच्या ओढे, नाल्यात पाणी सोडल्यास कुणाचे वाद किंवा नुकसान होणार नाही, अशी तक्रार येथील ज्ञानदेव शिंदे, भाऊसाहेब शिंदे, लीलाबाई सुपेकर व गजानन जासूद यांनी महाराष्ट्र रस्ते विकास संस्थेचे कार्यालयाकडे लेखी केली आहे.

खोकरफाटा ते खानापुर रोडच्या रस्ता रूंदीकरण व डांबरीकरणादरम्यान विधाटेवस्ती जवळील गट नं. 376 मध्ये शेतकर्‍यांची पुलाची व नळ्यांची मागणी असताना याकडे संबधीत अधिकारी व ठेकेदार यांनी दुर्लक्ष केल्याने येथील सुमारे बारा एकर क्षेत्र पावसाच्या पाण्याखाली आहे. जोपर्यंत पुलाचे व नळ्यांचे काम होत नाही तोपर्यंत दरवर्षी पावसाळ्यात संजय विधाटे, राजेंद्र विधाटे, निवृत्ती विधाटे, बाळासाहेब गवारे व गणेश गवारे यांच्या शेतातील पिकांचे नुकसान होणार आहे. रस्त्यांच्या दुतर्फा ओढे व नाल्यापर्यंत पाणी पोहचविण्यास साईड गटारीवर काम करण्याची गरज आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com