नालेसफाई, वाढदिवसांचे सेलिब्रेशनवरून नगरसेवक आक्रमक

महापालिका: स्थायी समितीची ऑनलाईन सभा
नालेसफाई, वाढदिवसांचे सेलिब्रेशनवरून नगरसेवक आक्रमक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वारंवार बंद राहत असलेले लसीकरण, पावसाळा सुरू झाल्यानंतर नालेसफाईची मंजूर करण्यात आलेली निविदा, वाढदिवसांचे सेलिब्रेशन, कोविड सेंटरमधील तात्पुरत्या उपाययोजनांवर लाखोंचा खर्च इत्यादी विषयांवर स्थायीची ऑनलाईन सभा आरोप-प्रत्यारोपांनी गाजली. अनेक महत्त्वाच्या विषयांवर नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अंतर्गत नाले, गटारी सफाईसाठी कंत्राटी कामगार पुरविण्याची निविदा मंजूर करण्यात आली. यावर काही नगरसेवकांनी आक्षेप घेत पावसाळ्यापूर्वीच निविदा प्रक्रिया का राबविण्यात आली नाही? असा सवाल उपस्थित केला. शहरातील करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम वारंवार बंद राहत असल्याने सभापती अविनाश घुले नगरसेवक सागर बोरुडे, रवींद्र बारस्कर चांगलेच आक्रमक झाले.

त्यावर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी लसीचे डोस जिल्हा परिषदेकडून प्राप्त झाले असून लसीकरण सुरू झाल्याचे सांगितले. मुंबई मनपाच्या धरतीवर लस खरेदी करण्याची मागणी यावेळी केली. मनपाने स्वतंत्र हॉस्पिटल उभारावी असा मुद्दा नगरसेवकांनी उपस्थित केला. सभापती घुले यांनी याबाबत लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com