
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या राष्ट्रीय साखर कामगार युनियनचे अध्यक्ष इंद्रभान पेरणे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे कामगार वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कारखाना सुरु होण्यापूर्वी कामगार युनियनच्या अध्यक्षपदी ज्ञानदेव आहेर होते. परंतु अनेकदा अध्यक्षांची गेटवर कामगारांच्या प्रश्नावरुन वादावादी झाली होती. परंतु असे असताना सुद्धा खा. डॉ. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली आहेर यांनी अतिशय संयमाने कामगारांशी वार्तालाप करून अनेक प्रश्न सोडवले. असे असताना सुद्धा काही कामगारांनी आहेर यांच्यावर आरोप केले होते. त्यावेळी आहेर यांना अध्यक्ष पदावरून पायउतार व्हावे लागले. कारखान्याचे मार्गदर्शक व संचालकांच्या विरोधात इंद्रभान पेरणे व इतर कामगारांनी कारखान्याच्या कार्यस्थळावर श्रीशिवाजी महाराज पुतळ्यासमोर कामगारांचे देणे मिळावे, यासाठी उपोषण सुरू केले होते.
परंतु या उपोषणाचा रोष संपूर्ण कामगार युनियन अध्यक्ष व सदस्यांवर होता. आहेर व सदस्य हे कारखान्याच्या संचालक मंडळाच्या अधीन झाले, असे त्यांच्यावर अनेक वेळा आरोप करण्यात आले होते. कामगारांच्या मागण्यांसाठी दहा ते बारा दिवस कामगारांनी उपोषण केले. हे उपोषण सोडविण्यासाठी अनेकांनी मध्यस्ती केली. शेवटी खासदार डॉ. सुजय विखे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे, भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी मध्यस्थी करून कामगारांच्या प्रश्नाची सोडवणूक करणार असल्याचे आश्वासन खा. डॉ. विखे यांनी दिले होते.
या मागणीमध्ये प्रमुख्याने तत्कालीन सत्तेत असणारी युनियन बरखास्त करण्यात यावी व नवीन युनियन स्थापन करण्याची मागणी त्यावेळी उपोषणकर्त्यांनी केली. त्यालाही सर्वांनी संमती दिली. तत्कालीन अध्यक्ष ज्ञानदेव आहेर यांचा राजीनामा घेण्यात आला नव्हता. पुन्हा या उपोषणकर्त्यांनी आहेर यांना हटवा, नाहीतर आम्ही आत्मदहन करणार असल्याचा इशाराही दिला होता. त्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे यांनी मध्यस्थी करून आहेर यांचा राजीनामा घेऊन नूतन निवडीचे सर्व अधिकार इंद्रभान पेरणे यांना देण्यात आले. त्यानंतर पेरणे यांनी उपोषणासाठी बसलेले त्यांचे सर्व सहकारी यासह बारा नूतन सदस्यांची नेमणूक केली व जुन्यापैकी तीन सदस्य या संघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले.
अशा सर्व घडामोडीमध्ये अध्यक्षपदी पेरणे, उपाध्यक्षपदी अर्जुन दुशिंग, सेक्रेटरी म्हणून बबन काळे यांची नियुक्ती करण्यात आली. या सर्व घडामोडी झाल्यानंतर युनियनच्या बैठकीमध्ये सर्व सह्यांचे अधिकार अध्यक्ष व सेक्रेटरी यांना एकमुखी देण्यात आले. असे असतानासुद्धा पाच महिन्याच्या कालखंडामध्ये युनियनचे अध्यक्ष पेरणे यांनी राजीनामा दिल्यामुळे कामगार वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
युनियनचे अध्यक्ष इंद्रभान पेरणे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले, युनियनमध्ये असणारे सदस्य मला सहकार्य करत नसल्यामुळे मी अध्यक्षपदाचा राजीनामा सेक्रेटरी यांच्याकडे दिला आहे, अशी माहिती अध्यक्ष इंद्रभान पेरणे यांनी दिली.