‘डॉ. तनपुरे’ कार्यस्थळी सामूहिक मुंडण तर राहुरीत कामगारांच्या चिमुकल्यांचे उपोषण

बाहेरील कामगारांवर हल्ला करणार्‍या सहा कामगारांवर गुन्हा दाखल
‘डॉ. तनपुरे’ कार्यस्थळी सामूहिक मुंडण तर राहुरीत कामगारांच्या चिमुकल्यांचे उपोषण

राहुरी (प्रतिनिधी)

डॉ.तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला आता तब्बल 12 दिवस उलटून गेले आहेत.

त्यामुळे आंदोलनाची तिव्रता दिवसेंदिवस वाढत असतानाच कामगारांची मुलेही आपल्या वडिलांच्या समर्थनार्थ राहुरी येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर उपोषणास बसली आहेत. तर संतप्त कामगारांनी बाहेरील कामगाराच्या तोंडाला काळे फासल्याप्रकरणी डॉ.तनपुरे कारखान्याच्या सहा कामगार व इतर सहा जणांविरूद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारा दिवस उलटून गेले तरीही कामगारांच्या प्रश्‍नावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे संतप्त कामगारांनी काल शुक्रवारी सकाळी मुंडण करून आपला निषेध नोंदविला. आता हे आंदोलन कोणत्या वळणावर जाणार? याबाबत शेतकरी सभासद व नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

दोन दिवसांपूर्वी बाहेरच्या कामगारांना चलेजावचा इशारा देत राहुरीच्या कामगारांनी त्यांना राहुरीच्या कार्यस्थळी येऊ नका, अशी तंबी दिली होती. मात्र, दुसर्‍या दिवशी विवेकानंद नर्सिंग होममध्ये बाहेरील एक कामगार तेथे काम करीत असल्याचे समजल्यावरून राहुरीच्या सुमारे 100 हून अधिक कामगारांचा जमाव तेथे गेला. त्यांनी बाहेरील कामगाराच्या तोंडाला काळे फासून तेथून निघून जाण्यास सांगितले.

डॉ.तनपुरे कारखान्यात अकाउंट म्हणून नोकरी करत असलेले अविनाश खर्डे यांना सहाजणांनी मिळून जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्या तोंडाला काहीतरी लावून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद खर्डे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. ही घटना दि. 2 सप्टेंबर रोजी राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे घडली.

अविनाश दिनकर खर्डे हे तनपुरे सहकारी साखर कारखाना राहुरी फॅक्टरी येथे अकाउंटंट म्हणून नोकरी करत आहेत. ते दि. 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी राहुरी फॅक्टरी येथील नर्सिंग होमच्या बाहेर असताना यातील आरोपींनी गैर कायद्याची मंडळी एकत्र जमविली. तसेच कट करून ते म्हणाले, तू जर आला तर तुझे हात-पाय कापून तुला मारून टाकू. अशी धमकी देऊन यातील आरोपींनी अविनाश खर्डे यांच्या अंगाला व चेहर्‍याला काहीतरी लावून नुकसान केले आहे.

खर्डे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत आरोपी इंद्रभान भाऊसाहेब पेरणे, सचिन गोपाळ काळे, सीताराम शिवराम नालकर, नामदेव बापू शिंदे, सुरेश पाराजी तनपुरे, बाळासाहेब माधव तारडे व इतर चार ते पाच अनोळखी लोक सर्व राहणार राहुरी, या सर्व जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, कामगारांच्या समर्थनार्थ कामगारांच्या चिमुकल्या मुलांनीही उपोषणाचे हत्यार उपसले आहे. राहुरी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच जोरदार घोषणाबाजी करीत या मुलांनी आपल्या कामगार पित्याला पाठिंबा व्यक्त केला आहे. तर काल सकाळी कामगारांनी सामूहिक मुंडण करून आपला निेषेध नोंदविला. यावेळी कामगारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

कामगारांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी तज्ज्ञ संचालक खा. डॉ. सुजय विखे व कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे यांनी उपोषणार्थी कामगारांची उपोषणस्थळी दोनदा भेट घेऊन विचारपूस करून त्यांच्या प्रश्‍नावर चर्चा केली. त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा प्रस्ताव कामगारांनी धुडकावून लावत आपले आंदोलन चालूच ठेवले आहे. आंदोलनाला आता बारा दिवस उलटून गेले आहेत. त्यावर तोडगा काढून समन्वय साधण्याची अपेक्षा शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

एकीकडे कामगारांच्या आंदोलनाची धार तीव्र होत असताना विद्यमान संचालक मंडळाची मुदत दि. 31 ऑगस्ट रोजी संपली आहे. मुदतवाढ मिळण्यासाठी खा. डॉ. सुजय विखे यांनी राज्य सरकार दरबारी प्रयत्न सुरू केले आहेत. तर कामगारांंच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठीही ते प्रयत्नशील आहेत.

दरम्यान, डॉ. तनपुरे कारखान्याचा गळीत हंगाम आता उंबरठ्यावर उभा आहे. कारखान्याचे धुराडे पेटले तरच राहुरी तालुक्याचे व शेतकर्‍यांचे अर्थचक्र फिरणार आहे. त्यामुळे कामगारांनी दोन पावले मागे जाऊन गाळप हंगामाच्या तयारीला लागून ही कामधेनू जिवंत ठेवावी, अशी अपेक्षा सभासद शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com