
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी फॅक्टरी येथे सुरु असलेले श्री शिवाजी विद्यानिकेतनच्या कर्मचार्यांचे उपोषण डॉ. तनपुरे कारखान्याचे चेअरमन तथा शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे व जनरल सेक्रेटरी महेश पाटील यांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे.
राहुरी फॅक्टरी येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यानिकेतन विद्यालयातील कर्मचार्यांनी थकित पगार मिळावेत, भविष्य निर्वाहनिधी हप्ते भरावेत, कायम कर्मचार्यांना इतर संस्थेमध्ये समायोजित करावे यासाठी गेल्या आठ दिवसांपासून कारखाना कार्यस्थळावर उपोषण सुरू केले होते. आठ दिवसांपासून शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये बातचीत सुरू होती.
काल डॉ. तनपुरे कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी महेश पाटील, देवळाली प्रवरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, राहुरीचे तहसीलदार एफ. आर. शेख, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, मंडळाचे अधीक्षक अंबादास पारखे, सुरेश लांबे आदींनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करत याबाबत तोडगा काढला व संबंधित उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन दिलेले असल्याने उपोषणकर्त्यांनी हे उपोषण मागे घेतले आहे.