डॉ. तनपुरे कारखान्याची मालमत्ता जिल्हा बँकेकडून सील

कारखाना कामगारांकडून बँक प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन
डॉ. तनपुरे कारखान्याची मालमत्ता जिल्हा बँकेकडून सील

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्याची कामधेनू डॉ. बा. बा. तनपुरे कारखान्याच्या व्यवस्थापनाने यंदाच्या हंगामात गळीत हंगाम चालू करण्यास असमर्थता दर्शविल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 1 नोव्हेंबर रोजी 35 सुरक्षा रक्षक तैनात करून कारखाना मालमत्तेचा ताबा घेतल्यानंतर शनिवार, 5 नाव्हेंबर रोजी कारखान्याच्या कर्मचार्‍यांना बाहेर काढून कारखान्याचे मुख्य प्रवेशद्वार, केंद्रीय कार्यालय, पेपर मिल तसेच पेट्रोल पंप सील करून त्यासंबधीचे सूचना फलक लावले आहे.

दरम्यान सन 2013 साली जिल्हा बँकेने डॉ. तनपुरे कारखान्याची चल- अचल मालमत्ता जप्त केली होती. त्यानंतर 2016 साली कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीत डॉ. तनपुरे कारखान्यावर खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ सत्तेवर आले. त्यावेळी बँकेने कारखान्यावर असलेल्या कर्जाचे पुनर्गठन करून जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्जफेडीबाबत काही शर्ती व अटीवर बँक व कारखाना व्यवस्थापन यांच्यात द्विपक्षीय करार करून कारखान्याची मालमत्ता संचालक मंडळाच्या ताब्यात देण्यात आली. सन-2013 ते सन-2016 दरम्यान 3 वर्षे बंद पडलेला कारखाना 2017-18 पासून खा. डॉ. विखेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. मात्र, 2019-20 वर्षात कार्यक्षेत्रात ऊस टंचाईमुळे कारखाना बंद होता. मागील वर्षी 4 लाख 85 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले.

कारखाना व्यवस्थापनाने चार वर्षे उसाचे गाळप करून 48 कोटी रुपये बँकेला कर्जापोटी अदा केले. परंतु, सर्व रक्कम व्याजात जमा झाली. कर्ज पुनर्गठन करताना 90 कोटींची मुद्दल कायम राहिली. त्यावर ऑक्टोबर 2022 अखेर 21 कोटींच्या व्याजासह 111 कोटी कर्जाची थकबाकी झाली. बँकेने कर्जफेडीसाठी 500 रूपये ऐवजी 100 रुपये प्रतिक्विंटल साखरेवरील टॅगिंग करावे, अशी मागणी कारखाना व्यवस्थापनाने बँकेस केली परंतु, बँकेने नकार दिल्याने कारखाना व्यवस्थापनाने यंदाचा गळीत हंगाम सुरू करण्यास असमर्थता दाखविली. त्यामुळे अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेने कारखान्याची मालमत्ता जप्त करून कारखान्याचे मुख्य प्रवेशद्वार, केंद्रीय कार्यालय गेट, पेपरमिल व पेट्रोल पंप सील केले आहे. सदरची कारवाई जिल्हा बँकेचे प्राधिकृत अधिकारी नंदकुमार पाटील, जयंत देशमुख, सुरेश पाटील, राजेंद्र पाटील, मच्छिंद्र तनपुरे, गोरक्षनाथ मंडलिक, बाबासाहेब शिंदे, भाऊसाहेब कोतकर, राजेंद्र शेरकर यांनी केली आहे.

जिल्हा बँकेचे आधिकारी कारखान्याची मालमत्ता जिल्हा बँक सिल करीत असताना कारखान्याच्या कामगारांनी त्याठिकाणी एकत्रित येऊन बँक व्यवस्थापनाला आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात साखर कामगार युनियन संघटनेसह सर्व कामगारांनी अडचणीबाबत खुलासा केला असून त्यात म्हटले की, कारखाना परीसर व कामगार वसाहतीसाठी व कारखान्याचे संरक्षणाचे दृष्टीने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कामावर ठेवण्यात यावे. बँक यापुढे कारखाना सुरु करण्याचे दृष्टीने जो प्रयत्न करणार आहे. अर्थात निविदा काढणार त्यामध्ये कामगारांची सर्व थकीत रकमांचा उल्लेख किंवा अंतर्भाव व्हावा, जो निविदाधारक कारखाना सुरु करण्याचे दृष्टीने कारखाना चालवयास घेईल त्यास कारखाना कायम कामगारांना कामावर घेण्याचे बंधनकारक करावे. बँकेने निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पुर्ण करून सर्व कारखाना कामगारांची होणारी उपासमार टाळून सन 2022-23 चा गाळप हंगाम सुरु करावा, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com