डॉ. तनपुरे कारखाना कामगारांबरोबर चर्चा करून मार्ग काढू - ढोकणे

उपोषणस्थळी कामगारांबरोबर चर्चा; प्रश्नांची विचारपूस
डॉ. तनपुरे कारखाना कामगारांबरोबर चर्चा करून मार्ग काढू - ढोकणे

उंबरे |वार्ताहर| Umbare

डॉ. तनपुरे कारखान्याचे मार्गदर्शक खा. डॉ. सुजय विखे हे राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या भेटीसाठी गेले आहेत. कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत दि. 31 ऑगस्टपर्यंत आहे. एक वर्षासाठी मुदतवाढ मिळावी, यासाठी खा. डॉ. विखे हे प्रयत्नशील आहेत. मुदतवाढ मिळाल्यास कारखाना सुरू करण्यासाठी आर्थिक उपलब्धता सोयीची होईल. परवाानगी मिळताच सर्व कामगारांना हजर करून घेतले जाणार असून कामगारांचे थकीत पगार देण्यासाठी कामगारांबरोबर चर्चा करून किती पगार अदा करायचे? याविषयी सर्वानुमते चर्चा करण्यात येणार आहे. मुदतवाढ मिळाल्यास संचालक मंडळाने प्रॉव्हिडंड फंडाची रक्कम उपलब्ध करून भरण्याची तयारी दाखविली आहे. अशी माहिती डॉ. तनपुरे कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे यांनी दिली.

कामगारांनी आपले उपोषण मागे घेऊन सभासद व कामगारांच्या हितासाठी कारखाना सुरू करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन ढोकणे यांनी केले आहे.

डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कामगारांच्या उपोषणस्थळी ढोकणे यांंनी भेट देऊन त्यांची विचारपूस करून त्यांच्याशी प्रश्नांवर चर्चा केली. ते म्हणाले, खा. डॉ. विखे हे कारखाना सुरू करण्यासाठी आग्रही आहेत. कामगारांनी आतापर्यंत मोठे सहकार्य केले आहे. त्यांच्याविषयी कोणतीही आकसबुद्धी नाही. कामगारांनी संचालक मंडळाला यापुढेही सहकार्य करावे, असे आवाहन ढोकणे यांनी केले.

यावेळी कामगारांनी शिष्टमंडळासमोर प्रोव्हीडंड फंड भरण्याची मागणी करून थकीत पगाराविषयी चर्चा करून तोडगा काढू, सक्षम अधिकार्‍यांसमोर लेखी स्वरूपाची हमी द्यावी, कामगार संघटना ही संचालक मंडळाच्या दावणीला बांधलेली आहे. ती अगोदर बरखास्त करा, बाहेरील कामगारांचा कारखान्यात होणारा हस्तक्षेप थांबवा, स्थानिक कामगारांना प्राधान्य द्या, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.

यावेळी ही बैठक सुरू असताना कामगारांच्या संपाला आमदार लहु कानडे यांनी भेट देऊन कामगार व संचालक मंडळाबरोबर चर्चा केली. आ. कानडे म्हणाले, कामगार व सभासदांच्या हितासाठी सहकार मंत्र्यांकडे आपले म्हणणे सादर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com