‘डॉ.तनपुरे’च्या अध्यक्षपदी नामदेवराव ढोकणे
सार्वमत

‘डॉ.तनपुरे’च्या अध्यक्षपदी नामदेवराव ढोकणे

उपाध्यक्षपदी दत्तात्रय ढूस । स्वीकृत संचालकपदी सुभाष वराळे

Arvind Arkhade

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी तालुक्याची कामधेनू असलेल्या डॉ. तनपुरे साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी नामदेवराव ढोकणे यांची तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय ढूस तसेच स्वीकृत संचालकपदी सुभाष वराळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

नूतन पदाधिकारी निवडी संदर्भातील बैठक काल कारखाना कार्यस्थळावरील सभागृहामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी रामेंद्र कुमार जोशी यांच्या अधिपत्याखाली पार पडली. यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक खासदार डॉ. सुजय विखे हे देखील उपस्थित होते. ढोकणे यांच्या नावाची सूचना उदयसिंह पाटील यांनी मांडली तर त्यास अनुमोदन शामराव निमसे यांनी दिले. ढूस यांच्या नावाची सूचना महेश पाटील यांनी मांडली त्यास संचालक अशोक खुरुद यांनी अनुमोदन दिले.

पंधरा दिवसांपूर्वी कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील व उपाध्यक्ष शामराव निमसे यांनी वरिष्ठांच्या सांगण्यानुसार आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. गेली चार वर्ष या दोघांनी कारखान्याचा कारभार सांभाळत असताना अनेक आव्हानांना तोंड दिले. बंद पडलेला कारखाना पुन्हा सुरू व्हावा, यासाठी कारखान्याच्या सभासदांनी माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्याकडे सत्ता बहुमताने सुपूर्त केली होती.

त्यानंतर विखे यांचे निष्ठावंत असणारे अ‍ॅड. सुभाष पाटील यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील यांना अध्यक्ष तर शामराव निमसे यांना उपाध्यक्ष करून युवा नेतृत्वाला संधी दिली होती. निवडणूक कालावधीमध्ये तत्कालीन आमदार व जिल्हा बँकेचे संचालक शिवाजीराव कर्डिले यांनी निवडून येणार्‍या संचालक मंडळास जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकार्य करण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार त्यांनीही गेल्या चार वर्षांपासून जिल्हा बँकेच्या माध्यमातून कारखाना संचालक मंडळाला मोठे सहकार्य केले आहे.

मागील वर्षी कमी उसामुळे हा कारखाना सुरू करता आला नव्हता. मात्र, त्याआधी दोन गळीत हंगामामध्ये संचालक मंडळाने केलेल्या प्रयत्नामुळे दोन हंगाम यशस्वीरित्या पार पडले होते. यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊस असल्याने हा गळीत हंगाम यशस्वी होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आर्थिक संकटातून देखील हा कारखाना सावरण्याची शक्यता आहे.

नूतन पदाधिकार्‍यांचा खा. डॉ.विखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कारखान्याचे मावळते अध्यक्ष उदयसिंह पाटील, मावळते उपाध्यक्ष शामराव निमसे, भाजपाचे ज्येष्ठ नेते आसाराम ढूस, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश करपे, तान्हाजी धसाळ, संचालक सुरसिंग पवार, मच्छिंद्र तांबे, केशवराव पाटील, महेश पाटील, विजय डौले, उत्तमराव आढाव, बाळकृष्ण कोळसे, भारत तारडे, मधुकर पवार, नंदकुमार डोळस, रवींद्र म्हसे, अर्जुन बाचकर, शिवाजी सयाजी गाडे, अशोक खुरुद, सौ. पार्वतीबाई तारडे, हिराबाई चौधरी, कार्यकारी संचालक बी. एन. सरोदे यांच्यासह दत्तात्रय खुळे, हरिभाऊ खुळे, डी. आर. खुळे, प्रकाश आढाव, बाबासाहेब कार्ले, सुदाम कार्ले, प्रवीण आढाव, नितीन आढाव आदी उपस्थित होते.

दरम्यान उंबरे गावाला पहिल्यांदा कारखाना अध्यक्षपदाचा मान तर देवळाली प्रवराला प्रथमच उपाध्यक्षपद मिळाल्याने या गावातील कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये भाजपाचे राहुरी येथील माजी नगरसेवक सुभाष वराळे यांना स्वीकृत संचालक घेण्याबद्दलही ठराव मांडण्यात आला व त्यांना स्वीकृत संचालकपदी घेतले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com