डॉ.तनपुरे कारखान्याचे चाक लवकरच फिरणार

अध्यक्ष नामदेवराव ढोकणेंनी केली पाहणी || कामगार यंत्र दुरूस्तीत व्यस्त
डॉ.तनपुरे कारखान्याचे चाक लवकरच फिरणार

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी तालुक्याची कामधेनू असलेल्या व तज्ज्ञ संचालक खा. डॉ. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखालील डॉ.तनपुरे साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. काल गुरूवारी कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे यांनी आपल्या सहकारी संचालकांसमवेत कारखान्याच्या मशिनरींची पाहणी केली. यावेळी कामगारांना त्यांनी सूचना केल्या.

सध्या कारखान्याच्या मशिनरीची ‘साफसफाई’ सुरू झाली आहे. कारखान्याचा गाळप हंगाम आता उंबरठ्यावर आला आहे. त्यासाठी कामगारांनी मशिनरींच्या देखभाल दुरूस्तीसाठी मोठी मोहीम राबविली आहे. क्लिनींगचे युद्धपातळीवर काम सुरू झाले आहे. डॉ.तनपुरे कारखाना आता सुरू होणार असल्याने शेतकर्‍यांबरोबरच कामगारांमध्येही उत्साह संचारला आहे. त्यांच्या बरोबरीने संचालक मंडळही डोळ्यात तेल घालून कारखाना सुरू करण्यासाठी यांत्रिक दुरूस्तीसाठी प्रयत्न करीत आहेत. मागील वर्षी तांत्रिक बिघाडामुळे गाळपासाठी व्यवस्थापन आणि कामगारांना कमी वेळ मिळाला. मात्र, आता पूर्ण ताकदीनिशी कारखाना सुरू करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

यंदा व्यवस्थापनाने ऊस गाळपाचे मोठे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. प्रतिदिनी 4500 टन ऊस गाळप क्षमता असलेला हा कारखाना पूर्ण गाळप करणार असल्याची चर्चा आहे. ऑक्टोबर महिन्यात रोलर पूजन व नोव्हेंबर महिन्यात गाळपाचा प्रत्यक्ष शुभारंभ होणार असल्याचे संकेत व्यवस्थापनाने दिले आहेत. त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू असल्याची माहिती अध्यक्ष नामदेवराव ढोकणे यांनी दिली. यावेळी कारखान्याचे संचालक उत्तमराव आढाव, रवींद्र म्हसे, नानासाहेब आढाव, कामगार उपस्थित होते.

यावर्षी राहुरी तालुक्यात सुमारे 10 हजार हेक्टर ऊस गाळपासाठी उभा आहे. बाहेरील सुमारे 12 कारखान्यांचेही कोयते राहुरीच्या उसाच्या फडावर चालणार आहेत. अशातच उसावर हूमणी अळीचा प्रादूर्भाव झाल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होऊन उसाचे टनेज घटण्याची भिती शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राहुरी कारखाना व्यवस्थापनाने गाळप हंगाम शुभारंभानंतर तातडीने ऊस गाळपासाठी नेण्याची मागणी कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.