नाकर्त्या लोकांकडून सभासदांची दिशाभूल; चक्री उपोषण करणारांचा बोलविता धनी कोण?

सत्ताधार्‍यांच्या पायाखालची वाळू सरकली; आमच्या चौकशीची नौटंकी - अमृत धमाळ
नाकर्त्या लोकांकडून सभासदांची दिशाभूल; 
चक्री उपोषण करणारांचा बोलविता धनी कोण?

उंबरे |वार्ताहर| Umbare

कर्जाच्या खाईत लोटून बंद पडलेला डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखाना खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी अनेक अडचणींना सामोरे जात सक्षमपणे चालविला. मात्र, काही नाकर्त्या लोकांकडून सभासदांची दिशाभूल केली जात असून कारखाना बंद पडण्यास जबाबदार असणार्‍या सर्वांची चौकशी करावी, आंदोलन करणार्‍यांचा बोलविता धनी कोण? हे देखील समोर आले पाहिजे, अशी मागणी पंचायत समितीचे सदस्य सुरेशराव बानकर व अमोल भनगडे यांनी केली आहे.

डॉ. तनपुरे कारखान्याच्या विविध मुद्यावर कारखाना बचाव समितीने उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याबाबत तीव्र विरोध दर्शवत विखे समर्थक कार्यकर्त्यांनी व सभासदांनी तहसीलदार फसीयोद्दीन शेख व पोलीस निरीक्षक मेघ:शाम डांगे यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले की, डॉ. बा.बा. तनपुरे सहकारी साखर कारखाना सन-2014 ते 2017 या कालावधी मध्ये बंद होता. अनेक शेतकर्‍यांनी स्वर्गीय पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्याकडे डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू करणे बाबत लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानुसार डॉ. सुजय विखे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली खाली निवडणूक होऊन दि. 26 जून 2016 रोजी नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आले.

या संचालक मंडळाने अहोरात्र प्रयत्न करून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ताब्यात असलेला कारखाना ताब्यात घेतला व कारखाना गळीत हंगाम 2017/18 पासून सुरू करण्यात आला. हा कारखाना सन 1956 मध्ये स्थापन झालेला आहे .मशिनरी अत्यंत जुनी झालेली आहे. तसेच कारखाना बंद असल्यामुळे मशिनरीमध्ये अनेक बिघाड झालेले होते. या अडचणीच्या काळातही डॉ. सुजय विखे पाटील यांनी रात्रंदिवस प्रयत्न करून कारखाना चालू केलेला आहे. सन- 2017/18, 2018/19, 2020/22 व 2021/22 हे सिझन व्यवस्थितरित्या पार पाडलेले आहेत. सिझन 2019/20 कारखान्याच्या परिसरात ऊसच नव्हता, त्यामुळे बंद ठेवावा लागला होता. या सिझनमध्ये गाळप झालेल्या उसाचे सर्व पेमेंट करण्यात आलेले आहे.

या कालावधीमध्ये कामगारांचे जवळ जवळ 95 टक्के पगार अदा करण्यात आलेले आहेत. तसेच कामगारांचा 8 कोटी रुपये पी.एफ भरण्यात आलेला आहे. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 50 कोटी रुपये त्यांच्या कर्जापोटी अदा करण्यात आलेले आहेत. कारखाना व्यवस्थित घालू असताना काही विघ्नसंतोषी मंडळी सातत्याने कारखान्याचे संचालक मंडळावर गैरव्यवहाराचे आरोप करीत होते. त्यामुळे खा. डॉ.सुजय विखे पाटील यांना दि. 30 सप्टेंबर 2022 रोजीचे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विरोधकांना कारखाना चालविण्याचे खुले आव्हान दिले होते. परंतु, कारखाना विरोधकांनी चालू केला नाही किंवा चालू करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही.

त्यामुळे सिझन 2022/23 बंद राहीलेला आहे व त्यामुळे तालुक्याची बाजारपेठ उद्ध्वस्त झालेली आहे. तसेच कामगारांचे व शेतकर्‍यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. काही शेतकरी मंडळी, चक्री उपोषण करणार आहेत. या उपोषणकर्त्याकडे कारखान्याची मोठ्या प्रमाणात बाकी आहे. त्यांचेवर व त्यांचे पाठीराखे यांच्यावर सेक्शन 88 खाली कारवाई चालू आहे. या कारखान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून काही नेत्यांनी त्यांचा स्वतःचा खाजगी कारखाना काढलेला आहे. त्यांनी उपस्थितीत केलेल्या मुद्यांची निश्चितपणे चौकशी व्हावी, यात शंका नाही.परंतु जे उपोषणास बसणार आहेत.

तेच कारखाना चालू करण्यासाठी चक्री उपोषण करायला निघाले. परंतु हा कारखाना तेच संचालक मंडळात कार्यरत असताना कारखाना बंद केला हा खरा मूळ प्रश्न आहे. ज्यांच्याकडे कारखान्याची लाखो रुपयांची थकबाकी आहे तेच कारखाना चालू करण्यासाठी उपोषण करतात. त्यांनी त्यांच्याकडील थकबाकी जरी भरली तरी कारखाना चालू करण्यास मदत होणार आहे. उपोषणकर्त्यांकडे असणारी थकबाकी बाबत न्यायालयाचा निर्णय देखील झाला आहे. तरी त्यांच्या मालमत्तेवर कारखान्याच्या बोजा टाकावा ही आमची मागणी आहे. वरीलप्रमाणे आम्ही सभासद ऊस उत्पादक शेतकरी तसेच संचालक या निवेदनाद्वारे कळवू इच्छितो की, आमच्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करावा, अन्यथा आम्ही देखील 30 दिवसांनंतर कोणत्याहीक्षणी कुठलीही नोटीस न देता उपोषण करू यांची प्रशासनाने नोंद घ्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी डॉ. तनपुरे कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे, व्हा. चेअरमन दत्तात्रय ढुस, अ‍ॅड. तानाजीराव धसाळ, सुरेशराव बानकर, अमोल भनगडे उत्तमराव मुसमाडे, महेंद्र तांबे, आशिष बिडगर, शिवाजी गाडे, धनराज जगताप, मच्छिंद्र गावडे, सुरसिंग पवार, दादा पाटील सोनवणे, नयन शिंगी, गोरक्षनाथ तारडे, उत्तमराव आढाव, आबासाहेब येवले, मधुकर पोपळघट, ज्ञानदेव निमसे, बाळासाहेब जाधव, अर्जुन बाचकर, नंदकुमार डोळस, अंकुश बर्डे, पंकज चौधरी, शामराव निमसे, उत्तमराव खुळे, चंद्रभान आढाव, दिलीप गाडे, बाबासाहेब शिंदे, अर्जुन लटके, ज्ञानेश्वर भिंगारदे, मच्छिंद्र तांबे, युवराज गाडे, विलास गोपाळे, सुभाष गायकवाड, प्रभाकर हरिश्चंद्रे, अक्षय तनपुरे, उमेश शेळके, कारभारी डौले, अनिल आढाव, रवींद्र म्हसे, चंद्रकांत म्हसे, बापूसाहेब धसाळ, प्रमोद झुगे, गोविंद म्हसे, दत्तात्रय काळे, केशव म्हसे, खा.डॉ. सुजय विखे यांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर विखे, मनोज गव्हाणे आदींसह सभासद उपस्थित होते.

सत्ताधार्‍यांच्या पायाखालची वाळू सरकली; आमच्या चौकशीची नौटंकी - अमृत धमाळ

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

तनपुरे साखर कारखान्यात मागील सहा वर्षात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाला. त्याच्या चौकशीच्या मागणीसाठी आज बुधवारपासून कारखाना बचाव कृती समितीतर्फे चक्री उपोषण सुरू होणार आहे. त्याचा धसका घेऊन, सत्ताधार्‍यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे, आमच्या चौकशीच्या मागणीची नौटंकी सुरू आहे. असे कृती समितीचे संयोजक अमृत धुमाळ यांनी सांगितले.

पत्रकारांशी बोलताना धुमाळ म्हणाले, मागील सहा वर्षे कारखान्यात भंगार विक्री, साखर विक्री, इथेनॉल विक्री, कारखाना मालकीची जमीन विक्री, कारखाना मालकीच्या जमिनीतील गौण खनिज उत्खनन व विक्री, कारखाना संलग्न संस्थेतील शिक्षक भरती, डोनेशन अशा विविध प्रकरणांत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता नसताना, साखर आयुक्तांची मान्यता नसताना प्रभारी कार्यकारी संचालकपदी बी. एन. सरोदे यांची नेमणूक करण्यात आली.

खासदार डॉ. सुजय विखे यांच्या ताब्यात सहा वर्षे कारखान्याची सूत्रे होती. त्यावेळी आमच्या चौकशीसाठी त्यांचे सहा वर्षे कुणी हात धरले होते काय? त्यांच्या गैरव्यवहारांच्या चौकशीची आम्ही मागणी केल्यावर यांना कंठ कसे फुटले? ते सभासदांच्या लक्षात आले आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाप्रमाणे कारखान्याच्या थकबाकीपोटी दोन लाख 32 हजार 540 रुपये भरले आहेत. कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यावर राजीनामे दिले नाहीत. त्यामुळे, सन 2022-23 गळीत हंगाम सुरू करण्याचा नैतिक अधिकार सत्ताधार्‍यांना होता. आमचा काहीही संबंध नव्हता. परंतु, यंदाच्या वर्षी कारखाना बंद ठेवून सभासद, कामगारांना वार्‍यावर सोडण्याचे पाप सत्ताधार्‍यांनी केले. विरोधकांनी कारखाना चालू करावा. असा कांगावा करून, कारखाना बंद ठेवण्याचा स्वतःचा नाकर्तेपणा दुसर्‍याच्या माथी मारण्याचा प्रकार केला आहे. चौकशीला आम्ही घाबरत नाही. दोषी आढळल्यास शिक्षा भोगण्यास तयार आहे. खुशाल आमची चौकशी करा. परंतु, तुमच्या गैरव्यवहाराची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. असे धुमाळ यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com