वादग्रस्त पोखरणा यांना सीएस पदावर नेमणूक दिलीच कशी?

भारतीय जनसंसदचे भद्रे यांचा सवाल
वादग्रस्त पोखरणा यांना सीएस पदावर नेमणूक दिलीच कशी?

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वादग्रस्त आणि कर्मचार्‍यांसह रुग्णांना त्रासदायक ठरणार्‍या डॉ. सुनील पोखरणा यांना नगर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक पदी नेमणूक देऊ नये. याबाबत शासनाला 2016 मध्येच पत्र पाठवूनही त्यांना या पदावर नेमणूक दिलीच कशी ? याचा तपास करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

याबाबत भद्रे यांनी सांगितले, 2015 मध्ये पोखरणा हे चिचोंडी पाटील येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी वर्ग-1 या पदी कार्यरत होते. मात्र ते चिचोंडी पाटील येथे मुख्यालयी राहत नसल्यामुळे भारतीय जनसंसदने तक्रार केल्यानंतर डॉ. पोखरणा यांची अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक या पदी बढतीवर बदली करण्यात आली. डॉ. पोखरणा यांची संपूर्ण कार्यकाळ भारतीय जनसंसदने तपासली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. पोखरणा यांचे स्वतःचे हॉस्पिटल नगर शहरामध्ये असल्यामुळे त्यांनी शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून संपूर्ण सेवा नगर जिल्ह्यातच केली आहे.

फक्त एकदा जळगाव येथे वर्ग-2 पदी बदली झाली असताना तेथे हजर न होता ते चिचोंडी पाटील येथे बदलून आले होते. डॉ. पोखरणा यांनी त्रास दिलेल्या एक परिचारिका शैला साळवे यांनी आत्महत्या केलेली आहे. साळवे यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या पोखरणा यांची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसह अनेक तक्रारी भारतीय जनसंसदने पुराव्यानिशी शासनाकडे केलेल्या असतानाही त्यांना शासनाने नियुक्ती दिलीच कशी याची चौकशी करावी, अशी मागणी अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, अशोक ढगे, सरपंच कैलास पठारे, भगवान जगताप, बबलू खोसला, भद्रे यांनी शासनाकडे केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com