सच्चा गांधीवादी हरपला..

सच्चा गांधीवादी हरपला..

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

विख्यात गांधीवादी व आपल्या कृतीतून सामाजिक कार्याचा आदर्श निर्माण करणारे ज्येष्ठ विचारवंत डॉ. एस. एन. सुब्बाराव उर्फ भाईजी यांचे काल जयपूरच्या सवाई मानसिंह हॉस्पिटलमध्ये निधन झाले. गांधी विचारांची कास धरून हे जग सुंदर करण्याचा ध्यास घेतलेल्या मोजक्या ज्येष्ठ व्यक्तिमत्वांपैकी भाईजी होते. त्यांच्या निधनाने सच्चा गांधीवादी हरपला असल्याची प्रतिक्रिया आ. डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे.

डॉ. एस. एन. यांना अनेकदा संगमनेरला निमंत्रित करून त्यांच्या कल्पनेतील विविध उपक्रम आम्हाला राबविता आले याचे समाधान आहे. त्यांनी सुचवलेला बाल महोत्सवाचा कार्यक्रम आजही अनेकांच्या स्मरणात आहे. जयहिंद लोकचळवळी मार्फत आयोजित विविध शिबिरात त्यांनी मार्गदर्शन केले होते.

एकदा 06 जानेवारीला ते संगमनेरलाआले होते तेव्हा पत्रकार दिनाचे औचित्य साधून संगमनेरमधील पत्रकार बांधवांचा त्यांच्या हस्ते सन्मान केला होता. अशा विविध प्रसंगी त्यांच्याशी झालेल्या भेटी, चर्चा आणि त्यांच्याबद्दल वाचलेल्या असंख्य आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.

गांधी विचारातून माणसाच्या विचारात परिवर्तन होऊ शकते यावर भाईजींचा ठाम विश्वास होता. त्यामुळेच चंबळच्या खोर्‍यातील क्रूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या अनेक दरोडेखोरांचे मन परिवर्तन करून भाईजींनी त्यांना आत्मसमर्पण करायला लावले. मन परिवर्तन झालेल्यांचे सामाजिक पुनर्वसन करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. भारत जोडो आंदोलनात युवकांना सोबत घेऊन काम केले. एक सच्चा देशभक्त आणि कृतिशील गांधीवादी विचारवंत सुब्बारावजी उर्फ भाईजींना भावपूर्ण श्रद्धांजली!

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com