जिल्ह्यातील सर्वात मोठे कोव्हिड लसीकरण प्रवरेत- डॉ. राजेंद्र विखे

जिल्ह्यातील सर्वात मोठे कोव्हिड लसीकरण प्रवरेत- डॉ. राजेंद्र विखे

लोणी |वार्ताहर|Loni

करोना महामारीचा शेवटचा प्रवास आता सुरू झाला आहे. कोव्हिड लसीकरण मोहीम हे यातील एक पाऊल आहे.

या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्वात मोठे लसीकरण प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठात सुरू झाल्याची माहिती विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी दिली.

प्रवरा मेडिकल ट्रस्ट, प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग यांच्यावतीने कोव्हिड योध्दांसाठी आयोजीत लसीकरण मोहीमेस काल डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजवीर भलवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के, डॉ. रविंद्र कारले, डॉ. राहुल कुंकुलोळ आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी करोना चाचणी, कोव्हिड रुग्णालय, करोना संदर्भात जनजागृती, आत्याधुनिक आयसीयू अशा प्रकारच्या सेवा जिल्ह्यात करोना संकट काळात उभारण्यात प्रवरा मेडिकल ट्रस्ट अग्रेसर राहिले आहेत असे नमूद केले. याकाळात कोव्हिड रुग्णांच्या उपचारात सर्वाधिक कमी डेथ रेशो राज्यात आपल्या कोव्हिड रुग्णालयाचा राहिला असल्याचेही त्यांनी सांगितले.

याला कारण म्हणजे डॉक्टरांनी केलेलेे काम. 1200 पेक्षा जास्त नागरिकांना या कोव्हिड रुग्णालयाची कोव्हिड संसर्गाच्या आजारातून मुक्त होण्यास मदत झाली तर 10000 पेक्षा जास्त नागरिकांची कोव्हिड चाचणीच्या सेवेचा लाभ या रुग्णालयातील लॅबच्या माध्यमातून घेतला. प्रवरा मेडिकल ट्रस्टने केलेले हे काम कोव्हिड साथीच्या इतिहासात कायम लक्षात ठेवले जाईल. पण आता वेळ आली आहे या साथीच्या आजारातून आपण अधिक सकारात्मकपणे बाहेर पडण्याची.

याचाच एक भाग असलेल्या कोव्हिड लसीकरण मोहिमेस आपल्याकडे आज पासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक मोठे लसीकरण आपल्या कॅम्पसमध्ये होत आहे. करोना लसीकरण या संसर्गजन्य साथीच्या मुक्तीची सुरुवात आहे, असे मनोगत डॉ विखे पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के यांनी शासनाची भूमिका आणि लसिकरणाची पध्दती या संदर्भात माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ. राहुल कुंकूलोळ यांनी केले. याप्रसंगी डॉ. अमित मणि आणि डॉ. शुभांगी मणि यांना कोव्हिड लसीकरण करून मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. मोहिमेची जनजागृती करण्यासाठी सेल्फी पॉईन्टस उभारण्यात आले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com