कृषीविषयक धोरणे प्रभावीपणे राबविण्याची गरज - डॉ.घोष

कृषीविषयक धोरणे प्रभावीपणे राबविण्याची गरज - डॉ.घोष

राहुरी विद्यापीठ |वार्ताहर| Rahuri

भारतामध्ये जैवविविधता खूप आहे. हरितक्रांतीनंतर पाण्याचा तसेच रासायनिक खते व किटकनाशकांचा अमर्याद वापर मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण झाला. भातासारख्या पिकातील जवळजवळ 5 हजार पारंपरिक वाण नष्ट झाले. या वाणांमध्ये रोग व किडींना प्रतिकारक असे अनेक चांगले गुणधर्म होते. त्यांचा वापर करुन अनेक नवीन वाण विकसित करता येऊ शकतात. त्यामुळे अशा वाणांचे जतन होणे गरजेचे आहे. हे सर्व काम जैव तंत्रज्ञान, रोप पैदास व अनुवंशंकीय शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन तयार केलेल्या नवीन संशोधनाची अंमलबजावणी प्रभावीपणे केली तरच भारतीय शेती टिकविता येईल, असे प्रतिपादन छत्तीसगड, रायपूर येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय जैविक तणाव व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ. पी.के. घोष यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील जागतिक बँक अर्थसहाय्यीत, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय कृषी उच्चशिक्षण प्रकल्प, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र व कृषी विद्या विभाग, पदव्युत्तर महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने भारतीय शेती टिकविण्याच्या दृष्टीने मुख्य शास्त्रीय नवकल्पनांची मागणी या विषयावर प्रमुख मार्गदर्शन करताना डॉ. पी.के. घोष बोलत होते. यावेळी डॉ. आनंद सोळंके, डॉ. मुकुंद शिंदे, डॉ. उल्हास सुर्वे उपस्थित होते.

डॉ. घोष म्हणाले, वातावरणातील बदलाचा सर्वात मोठा परिणाम विविध पिकांच्या उत्पादन क्षमतेवर होत असून अन्नधान्याचे उत्पादन व पुरवठा ही साखळी मोठ्या प्रमाणात बाधित झालेली दिसून येत आहे. शेतीचे निटनेटके संवर्धन, वैविध्यपूर्ण फेरबदल व काटेकोरपणे केली जाणारी शेती या तंत्रज्ञानाचा वापर करुन आपण भविष्यात शेतीतील उत्पन्न वाढ तसेच माती, पाणी व पर्यावरण या नैसर्गिक संसाधनांचे रक्षण करु शकू, असे ते म्हणाले.

स्वागत व प्रास्ताविक डॉ. मुकुंद शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. शुभांगी घाडगे यांनी तर आभार डॉ. उल्हास सुर्वे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ व विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.