
अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar
राज्यपालांवर काही बोलू नये, असा प्रघात आहे. पण भगतसिंग कोश्यारीच राज्याचे प्रश्न सोडून अन्य अनेक विषयांवर एवढे बोलले आहेत की, त्यांच्यावर बोलणे भाग आहे. पण, त्यांच्या विषयीची एक आठवण आयुष्यभर लक्षात राहणारी आहे व ती म्हणजे, उद्धवजी ठाकरेंचा राजीनामा स्वीकारण्यासाठी चक्क रात्री साडेदहापर्यंत कोश्यारी जागे होते व यासाठी त्यांनी जी तत्परता दाखवली, ती लोकांच्या लक्षात राहणारीच होती, अशी सूचक टीका विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी रविवारी येथे केली.
औरंगाबादहून शिर्डीला साई समाधी दर्शनासाठी गेल्यावर तेथून पुण्याकडे जाताना काही वेळ डॉ. गोर्हे नगरच्या शासकीय विश्रामगृहावर थांबल्या होत्या. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक गणेश कवडे, गौरव ढोणे, संग्राम कोतकर, रमेश खेडकर व अन्य उपस्थित होते. मावळते राज्यपाल कोश्यारींविषयी बोलताना डॉ. गोर्हे म्हणाल्या, राज्याचे प्रश्न सोडून महापुरुषांबद्दलची त्यांची भावना शून्य, निराधार व असंवैधानिक वक्तव्ये राज्यपाल पदाचा दुरुपयोग करणारी होती.
औचित्य सोडून महापुरुषांची बदनामी करणारी होती. त्यावरून राज्यभरातून असंतोष व्यक्त झाल्यावर त्यांनी राज्यपाल पद सोडण्याची व्यक्त केलेली इच्छा म्हणजे अपरिहार्यता होती, असे स्पष्ट करून त्या म्हणाल्या, त्यांच्या विषयीची उद्धवजींबद्दलची आठवण माझ्या कायम लक्षात राहणार आहे. उद्धवजींचा राजीनामा ताबडतोब स्वीकारला जावा, यासाठी रात्री साडे दहापर्यंत जागण्याची जी तत्परता त्यांनी दाखवली, ती लोकांच्या लक्षात राहणारीच होती, असे सूचक भाष्यही डॉ. गोर्हे यांनी केले.
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांना शुभेच्छा देते, असे सांगून डॉ. गोर्हे म्हणाल्या, किमान त्यांनी इकडे येताना इकडचा इतिहास-भूगोल, संस्कृती व मानसिकता समजून काम करावे. मागील राज्यपालांबद्दल अनेक तक्रारी झाल्या. त्यामुळे राज्यपालांनी सरकारशी समन्वय ठेवताना त्यात समतोल ठेवायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
महिला धोरणासाठी काही विषय
राज्याचे महिला धोरण येत्या 8 मार्चला जाहीर होणार आहे व या धोरणासाठी काही मुद्दे सुचवले असल्याचे सांगून डॉ. गार्हे म्हणाल्या, समान काम-समान वेतन देणारा आयोग आहे. पण, प्रसुती वा घरात कोणी आजारी असेल तर महिला नोकरीतून रजा घेतात, पण त्याचा परिणाम त्यांना प्रमोशन संधी कमी मिळते. यासाठी प्रमोशन संधीची वयोमर्यादा महिलांसाठी वाढवणे आवश्यक आहे. तसेच कौटुंबिक हिंसाचार प्रकरणातील जोडप्यांना फौजदारी,कौटुंबिक न्यायालय, दिवाणी न्यायालयात चकरा माराव्या लागतात. त्यामुळे अशाप्रकरणात एकच न्यायालय असावे, असे सुचवले असल्याचेही त्यांनी सांगितले. 1994 पासूनच्या महिला धोरणांचा अभ्यास करून महिलांनी नव्या महिला धोरणात काय असावे, याबाबत शासनाला सूचना करण्याचे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान शिर्डीच्या साई संस्थानने आत्महत्याग्रस्त शेतकर्यांची मुले तसेच कोविडमुळे पालक गमावलेल्या मुला-मुलींसाठी शिर्डीत निवासी संकुल उभारावे, अशी मागणी डॉ. गोर्हे यांनी केली. यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनाही भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्या कुटुंबातील महिलांना संधी हवी
पंढरपूरला रुक्मिणीदेवीच्या पूजेसाठी स्वतंत्र महिला पुजारी आहेत. तुळजापूर व कोल्हापूरला नाहीत. पण कोल्हापूरला पुजार्यांच्या परिवारातील महिलांना नैवेद्य वा अन्य सेवेची परवानगी आहे. पण, अशी परवानगी तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात नाही. तेथील गुरव पुजार्यांना देवीची पूजा करण्याचा अधिकार आहे, पण त्यांच्या कुटुंबातील महिलांना इच्छा असूनही मंदिर प्रशासनाची परवानगी नसल्याने तुळजाभवानी देवीची पूजा करता येत नाही. त्यामुळे त्यांना तेथे देवीची पूजा व सेवा करण्याची संधी मिळावी, अशी मागणी डॉ. गोर्हे यांनी केली. प्रत्येक मंदिर प्रशासनाचे नियम तसेच पावित्र्य पाळणे प्रत्येकालाच बंधनकारक असते. त्यामुळे कोल्हापूर व तुळजापूरला महिला पुजारी नेमायचे की नाही, हा त्यांचा अधिकार आहे. पण तसे झाले तर हरकत नाही, असे सूचक भाष्यही त्यांनी केले.
पत्रकार वारिशे परिवाराला 51 हजार
रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येच्या चौकशीसाठी एसआयटी नेमली आहे. पण पत्रकारांना येणार्या धमक्यांच्या चौकशीसाठी आयुक्त वा पोलिस अधीक्षक स्तरावर स्वतंत्र कक्ष व स्वतंत्र यंत्रणा नेमून चौकशी केली जावी, अशी मागणी डॉ. गोर्हे यांनी केली. यावेळी त्यांनी पत्रकार वारिशे परिवाराला स्वतःच्या पैशांतून 51 हजाराची मदत करीत असल्याचेही जाहीर केले व या परिवाराला पाठिंबा म्हणून ही मदत देत असल्याचेही स्पष्ट केले.