अकोले |प्रतिनिधी| Akole

डांगी प्रजातीच्या पशुधनामुळे अकोले तालुक्याची वेगळी ओळख निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर यांनी केले.

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित नाशिक पुरस्कृत व बायफ संचलित बायफ सीड बँक प्रकल्प अकोले अंतर्गत तालुक्यातील देवगाव येथे शास्त्रोक्त पद्धतीने पशुधन व्यवस्थापन आणि दुग्ध प्रक्रिया उद्योग या विषयाचे प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बिजमाता पद्मश्री सौ. राहीबाई सोमा पोपेरे, फूड मदर ममताबाई देवराम भांगरे, वन पुरुष तुकाराम भोरू गभाले, बायफचे नाशिक विभागप्रमुख जितीन साठे, पशुधन तज्ज्ञ व शास्त्रज्ञ डॉ. विठ्ठल विखे, गृह विज्ञान तज्ज्ञ सौ. अनुराधा वांढेकर, कृषी तज्ज्ञ तुषार जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

संभाजी नालकर यांनी उपस्थित शेतकर्यांना दुग्ध उपपदार्थ निर्मितीची सखोल माहिती दिली. डांगी गायीच्या दुधापासून तयार केले जाणारे विविध उपपदार्थ अकोले तालुक्याला नवी ओळख निर्माण करून देतील असे प्रतिपादन याप्रसंगी त्यांनी केले.

उपस्थित महिला आणि पुरुष गोपालक शेतकर्यांना त्यांनी डांगी गाईच्या दुधापासून तयार करायचे विविध उपपदार्थ जसे की गावरान तूप, दही चक्का, रसगुल्ले, खवा, पेढा, रसमलाई, बर्फी, खरवस वड्या, ताक, कुल्फी, मसाला दूध, बासुंदी, क्रीम, पनीर वड्या इत्यादी विविध प्रकारचे उपपदार्थ आपण घरच्या घरी कशी तयार करू शकतो.

याबद्दल सखोल माहिती दिली. डांगी पशुधन हे या भागाचे वैभव असून डांगी गाई म्हणजे प्रत्येक शेतकर्याच्या दारातील लक्ष्मी असल्याचे नमूद केले. देशामध्ये एकूण 27 प्रकारच्या दूध देणार्या गाई आढळतात त्यापैकी डांगे प्रजाती ही तिच्या खास वैशिष्ट्यांमुळे पहिल्या तीन मध्ये समाविष्ट होते हे गौरवास्पद आहे. विविध प्रकारच्या चारा पिकांची लागवड शेताच्या बांधावर करण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

डॉ.विठ्ठल विखे यांनी पशुधन संवर्धनाविषयी शास्त्रीय माहिती देताना चारा व्यवस्थापन, लसीकरण जंत आणि गोचीड निर्मूलन मुक्त गोठा पद्धत याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच मुक्त गोठा पद्धतीचे फायदे विषद करताना सर्वसाधारणपणे गाय लागवड केल्यानंतर 40 टक्के नैसर्गिकपणे गर्भधारणा होण्याची शक्यता असते.

परंतु मुक्त गोठ्यामध्ये जनावरांना उपलब्ध होणारे वातावरण व त्यांना मिळणारी आवश्यक जागा यांचा एकूण परिणाम होऊन गर्भधारणा होण्याची शक्यता 80 टक्क्यांपर्यंत वाढते.

ग्रह विज्ञान शाखेच्या प्रमुख सौ. अनुराधा वांढेकर यांनी आदिवासी भागातील महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी व कुपोषणाला आळा घालण्यासाठी दर्जेदार परसबागा तयार कराव्यात, असे आवाहन केले.

सेंद्रिय शेती तज्ज्ञ संपतराव वाकचौरे यांनी गावठी व डांगी गायींच्या मल मूत्रापासून सेंद्रिय शेतीसाठी बनवल्या जाणार्या विविध निविष्ठा तयार करण्याचे मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक जितीन साठे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रकल्प समन्वयक योगेश नवले यांनी केले. आभार केंद्र समन्वयक लीला कुर्हे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बायफ संस्थेचे रोहिदास भरीतकर, राम भांगरे, खंडू भांगरे, देवराम भांगरे यांनी विशेष योगदान दिले.