डॉ. जयश्रीताई थोरात यांनी साधला आरोग्यसेविकांशी संवाद

डॉ. जयश्रीताई थोरात यांनी साधला आरोग्यसेविकांशी संवाद

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात विकासाच्या योजना सातत्याने राबवल्या जात असून आरोग्य केंद्रांसाठी जास्तीत जास्त चांगल्या सुविधा निर्माण करून दिल्या आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना अत्यंत चांगल्या व अद्ययावत आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ही या नागरिकांसाठी आरोग्य मंदिर ठरावे यासाठी सर्वांनी काम करावे, असे आवाहन एकविरा फाउंडेशनच्या संस्थापिका व कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई बाळासाहेब थोरात यांनी केले.

जवळेकडलग व तळेगाव दिघे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. जयश्रीताई थोरात यांनी भेट देऊन तेथील आरोग्यसेविका, नर्स, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्याशी संवाद साधला. यावेळी समवेत इंद्रजीत थोरात, जि.प. सदस्य रामहरी कातोरे, महेंद्र गोडगे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत रहाटंळ, गरूड सहकारी संस्थेचे चेअरमन राजेंद्र कडलग, तळेगावचे सरपंच बाबासाहेब कांदळकर, अनिल कांदळकर, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, जवळे कडलगचे उपसरपंच निलेश कडलग, माजी सरपंच कैलास देशमुख, डॉ. नंदकर मॅडम, पंकज नाईकवाडी, प्रसाद कडलग, सौरभ कडलग, डॉ.धामसे, डॉ. माने आदिंसह गावातील विविध पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या, तालुक्यातील आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांनी करोना संकटात अत्यंत चांगले काम केले आहे. यापुढेही आपल्याला प्रत्येक कुटुंब हे निरोगी व सुदृढ बनवायचे आहे. यासाठी प्रत्येकीने मिशन निरोगी कुटुंब अंतर्गत काम करावे.

इंद्रजीत थोरात म्हणाले, ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने विकास कामांसाठी मोठा निधी मिळत आहे. प्रत्येक वाडी-वस्तीवर विकासाच्या योजना राबविल्या जात आहे. महिलांमध्ये आरोग्याची जागृती करण्याकरता सर्व आरोग्य सेविका व अंगणवाडी सेविका यांनी अधिक पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले. बाबासाहेब कांदळकर यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.