डॉ. शेळके आत्महत्या प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करा

मराठा महासंघ शिष्टमंडळासह गृहमंत्र्यांची भेट घेणार : दहातोंडे
डॉ. शेळके आत्महत्या प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करा

नेवासा (तालुका वार्ताहर) / Newasa - डॉ. गणेश शेळके आत्महत्या प्रकरणी दोषी अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करून गुन्हे दाखल करा, कुटुंबाला पन्नास लाखांची मदत देऊन डॉ. शेळके यांच्या पत्नीस सरकारी नोकरी द्यावी या मागण्यांसाठी राज्याचे गृहमंत्री व आरोग्यमंत्र्यांना शिष्टमंडळासह भेट घेणार असल्याचे मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे (Sambhaji Dahatonde) यांनी सांगितले.

तालुक्यातील बहिरवाडी येथील मयत डॉ. शेळके यांच्या कुटुंबियांची शुक्रवारी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी सांत्वन भेट दिली. त्यानंतर नेवासा येथे पत्रकारांशी बोलताना दहातोंडे म्हणाले की पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणार्‍या डॉ.गणेश शेळके यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून तीन दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी त्यांच्या जवळ सापडलेल्या चिठ्ठीत वरिष्ठांची नावे लिहिली होती.

दरम्यान त्यावेळी उपचारासाठी तातडीने साधी रुग्णवाहिकाही त्यांना मिळाली नाही. गटविकास अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी हे प्रकरण दडपण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. डॉ.शेळके यांच्या सुसाईड नोटमध्ये वरिष्ठांची नावे असल्याने पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करणे गरजेचे असताना अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. ताबडतोब दोषींवर गुन्हे दाखल करावेत यासाठी 13 जुलै रोजी राज्याचे आरोग्यमंत्री, गृहमंत्री यांची मराठा महासंघाच्या शिष्टमंडळासह भेट घेणार असून सविस्तर चर्चा करणार असल्याचे दहातोंडे यांनी संगीतले.

दोषींवर गुन्हे दाखल न झाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा संभाजी दहातोंडे, अशोक नांगरे, शामराव पवार, ज्ञानेश्‍वर शेलार, राजेंद्र शेटे, ज्ञानदेव कोरडे, दिलीप थोरात, रावसाहेब मरकड, ज्ञानेश्‍वर फसले, डॉ. महेश लगड, संतोष हंबर यांनी दिला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com