डॉ. अनिल बोरगे यांचा अटकपूर्व अर्ज फेटाळला; मिसाळ यांचा मंजूर

अर्जासंदर्भात सरकारी पक्षाचे म्हणणे मागितले असून यावर पुढील सुनावणी 15 जुलैला होणार आहे
डॉ. अनिल बोरगे यांचा अटकपूर्व अर्ज फेटाळला; मिसाळ यांचा मंजूर

अहमदनगर (प्रतिनिधी) - अल्पवयीन मुलाला मारहाण करून त्याचा छळ करणार्‍या प्रमुख आरोपींपैकी महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला, तर याच प्रकरणातील दुसरे आरोपी अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ यांना मात्र अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.

महापालिकेतील नर्स असलेल्या एका महिला कर्मचार्‍याच्या घरात दारूची पार्टी करणे, त्यास विरोध करणार्‍या त्या महिलेच्या मुलाला मारहाण करणे, चटके देणे, इमारतीवरून फेकून देण्याची धमकी देणे अशा प्रकारचा गुन्हा डॉ. बोरगे, मिसाळ यांच्यासह बाळू घाटविसावे आणि संबंधित नर्स यांच्यावर दाखल आहे. यातून अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून डॉ. बोरगे यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता.

मात्र तो फेटाळण्यात आला. जिल्हा न्यायाधीश पी. व्ही. चतुर यांच्यासमोर याची सुनावणी झाली. फिर्यादी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. एम. के. शेडाळे यांनी युक्तिवाद केला. डॉ. बोरगे महापालिकेतील जबाबदार अधिकारी आहेत. त्यांच्यावर गंभीर गुन्ह्याचा आरोप आहे. त्यांच्याकडील पदभार अन्य अधिकार्‍याकडे सोपविण्यात आला असल्याने त्यांचा जामीन अर्ज मंजूर करू नये, असा युक्तिवाद करण्यात आला.

तो ग्राह्य धरून फेटाळण्यात आला. अर्जासंदर्भात सरकारी पक्षाचे म्हणणे मागितले असून यावर पुढील सुनावणी 15 जुलैला होणार आहे. याच प्रकरणातील आरोपी असलेले शंकर मिसाळ यांचा अटकपूर्व अर्ज मात्र मंजूर करण्यात आला आहे. या अर्जाची सुनावणीही न्या. चतुर यांच्यासमोर झाली. मिसाळ यांच्या वतीने अ‍ॅड. विवेक म्हसे, अ‍ॅड. संजय वालेकर यांनी काम पाहिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com