
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
डिसेंबर 2022 मध्ये कल्याण रोड, आगरकर मळ्यात सहा जणांच्या टोळीने चार ठिकाणी सशस्त्र दरोडा टाकला होता. याच टोळीने बुधवारी पहाटे टिळक रोडवरील फ्लॅटवर दरोडा टाकून डाव साधल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. डॉ. अरूण जगन्नाथ वैद्य यांच्या फ्लॅटवर दरोडा टाकून 28 तोळे सोन्यांचे दागिने व 10 लाख रुपये रक्कम लुटली आहे. दरम्यान शहराच्या मध्यवर्ती भागात दरोडे पडत असल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
टिळक रोडवरील पटेल मंगलकार्यालयाच्या मागे वर्धमान रेसिडेन्सीत डॉ. वैद्य राहतात. तो फ्लॅट त्यांच्या मेव्हण्याचा आहे. बुधवारी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास लोखंडी रॉड, कोयता घेऊन त्यांच्या फ्लॅटमध्ये शिरलेल्या सहा दरोडेखोरांनी दहशत करत तब्बल 28 तोळ्याचे सोन्याचे दागिने व 10 लाख रुपये रोख रक्कम असा 21 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मध्यवर्ती भागात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान 26 डिसेंबर, 2022 रोजी रात्री सहा जणांच्या टोळीने धारदार शस्त्रांसह कल्याण रोडवरील विद्या कॉलनी, गाडळकर मळा, आगरकर मळ्यात चांंगलाच धुमाकूळ घातला होता. चार ठिकाणी केलेल्या धाडसी चोरीत सुमारे 13 तोळ्यांचे सोन्याचे दागिने, चांदी, रोख रक्कम, बँकेची कागदपत्रे, दुचाकी असा चार लाख 30 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील दोघांनाच अटक करण्यात आली आहे.
इतरांचा शोध अद्याप लागलेला नाही. आता पुन्हा कोतवाली हद्दीत टिळक रोडवर दरोडा टाकून दरोडेखोरांनी दहशत निर्माण केली आहे. हे तेच दरोडेखोर असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. जे सीसीटीव्ही फुटेजसमोर आले आहेत त्यातील व्यक्ती व डिसेंबरमध्ये टाकलेल्या दरोड्यातील व्यक्तींचे वर्णन एक समान असल्याचे पोलिसांनी ंसांगितले. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांसह कोतवाली पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक केली जाईल, असे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी सांगितले.
पक्की खबर असणार
दरोडेखोरांनी काही मिनीटांमध्ये हा सर्व प्रकार घडून आणला. यावरून त्यांना डॉ. वैद्य यांच्याविषयी माहिती असल्याची शक्यता आहे. दरोडेखोरांना पक्की खबर मिळाली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीकोनातूनही तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.