डॉ. आंबेडकर जयंती मिरवणुकीत दगडफेक

आणखी 19 आरोपींचा सहभाग निष्पन्न
डॉ. आंबेडकर जयंती मिरवणुकीत दगडफेक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दगडफेक करून जातीयवादी घोषणाबाजी दिल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आणखी 19 आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान या प्रकरणी सुरूवातीला 13 आणि आता 19 आरोपींचा सहभाग सिध्द झाल्याने आरोपींची संख्या 32 झाली आहे. सुरूवातीला 13 आरोपींना अटक करण्यात आली असून रविवारी रात्री एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. निष्पन्न झालेल्या आरोपींमध्ये अनेक अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुरूवार, 14 एप्रिल रोजी रात्री 11 वाजाता आरपीआयच्या आठवले गटाची मिरवणूक तेलिखुंट परिसरात आली असताना अचानक जातीयवादी घोषणाबाजी सुरू झाली. काही क्षणातच मिरवणुकीच्या दिशेने दगडफेक सुरू झाली. यावेळी घटनास्थळी बंदोबस्ताला असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी जमावाच्या दिशेने जाताच त्या समाजकंटकांनी पोलिसांवरही दगडफेक केली. या दगडफेकीत काही युवकांसह पोलिस कर्मचार्‍यांनाही मुक्कामार व किरकोळ दुखापत झाली.

पोलिसांनी घटनास्थळावरून 13 जणांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना उपलब्ध व्हिडीओ व पुराव्यावरून आणखी 19 आरोपींचा यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. त्यातील एकाला रविवारी रात्री ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान कोतवाली पोलीस ठाण्यात दगडफेक, जातीय घोषणाबाजी संदर्भात दाखल असलेल्या दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलिसांकडून सुरू असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

धार्मिक स्थळी लावण्यात आलेल्या भोंग्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर त्यांची अहमदनगर जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान रामनवमी व डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्ह्यात काही दुर्दैवी घटना घडल्या. पोलिसांनी यामध्ये वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. यासंदर्भात गुन्हे दाखल असून त्याचा तपास योग्य पध्दतीने सुरू असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.