डबल सीट, डबल पेंडल सायकलचे जिल्ह्यात प्रथमच राहात्यात आकर्षण

डबल सीट, डबल पेंडल सायकलचे जिल्ह्यात प्रथमच राहात्यात आकर्षण

राहाता |वार्ताहर| Rahata

जिल्ह्यात राहाता शहरात प्रथमच डबल सीट, डबल पेंडल व डबल हॅण्डल सायकल बघायला मिळाल्याने शहरात गेल्या काही दिवसांपासून लहान ते वयोवृद्ध नागरिकांना या सायकलचे आकर्षण झाले आहे.

डबल सीट डबल पेंडल सायकल आपण टीवीद्वारे परदेशात बघतो. परंतु राहाता येथील माजी सैनिक भानुदास गाडेकर यांनी नुकतीच नाशिक येथून ही सायकल खरेदी केल्याने राहाता शहरातील नागरिकांना या आगळ्या वेगळ्या सायकलचे कुतूहल झाले आहे. करोना काळात रोग प्रतिकारशक्ती असणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी नित्यनेमाने सायकलचा वापर केला तर शारीरिक व्यायाम होऊन रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होऊ शकते.

देशात वाहनांची वाढत्या संख्येमुळे प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने निसर्गाचा समतोल बिघडत असून परिणामी पर्जन्यमान दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. सायकलचा नियमित वापर केला तर इंधनाची बचत होऊन प्रदूषण कमी होण्यास नक्की मदत होईल. या सायकलचे चालक माजी सैनिक गाडेकर हे राहाता न्यायालयात सरकारी वकील कार्यालयात क्लर्क म्हणून कार्यरत असून ते डबल सीट, डबल पेंडल सायकलवरून दररोज सकाळी न्यायालयात कामकाजाकरिता जातात व दिवसभराचे कामकाज आटोपून सायंकाळी पुन्हा त्यांच्या घरी राहाता शहरातून सायकल प्रवास करीत असतात.

ही आगळीवेगळी सायकल बघून शहरातील अनेक नागरिक त्यांना थांबवून या सायकल स्वारीचा आनंद घेताना दिसतात. सध्या राहाता शहरात ही सायकल चर्चेचा विषय बनली आहे.

सायकलचा नियमित वापर आरोग्यासाठी उत्तम असून इंधनाची बचत होते. या सायकलवरून दोन जीवलग मित्र किंवा कुटुंबातील दोन व्यक्ती एकाच वेळेस प्रवास करू शकतात. प्रवासादरम्यान एकमेकांच्या मनातील सुख-दुःख व विचारांची देवाण-घेवाण सायकल प्रवासातून होण्यास नक्की मदत होईल. दो दिल एक साथ अशी या डबलसीट, डबल पेंडल, डबल हॅण्डल सायकल प्रवासाची संकल्पना आहे.

- भानुदास गाडेकर (माजी सैनिक राहाता)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com