'डॉस्टारलिमॅब'मुळे गुदव्दाराच्या कर्करोगातून रुग्ण झाला कॅन्सरमुक्त

डॉ. सतिश सोनवणे: अमेरिकेतील संशोधनामुळे आशेचा नवा किरण
'डॉस्टारलिमॅब'मुळे गुदव्दाराच्या कर्करोगातून रुग्ण झाला कॅन्सरमुक्त

अहमदनगर (प्रतिनिधी)

दुर्धर आजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅन्सरवरील उपचारांत मोठे संशोधन समोर आले आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे स्लोन मेमोरियल केटरिंग कॅन्सर सेंटर येथे मोठ्या आतड्याचा कॅन्सर असलेल्या काही रूग्णांना क्लिनिकल चाचणीत सुमारे सहा महिने डॉस्टारलिमॅब नावाचे औषध देण्यात आले.

त्याचा परिणाम म्हणजे हे रूग्ण पूर्णपणे कॅन्सरमुक्त झाले. त्यांच्या शरीरामधील कॅन्सरचा ट्युमर गायब झाल्याचे दिसून आले. प्राथमिक अवस्थेतील हे संशोधन कॅन्सर उपचारांत गेम चेंजर ठरू शकते. इतर प्रकारच्या कॅन्सर रूग्णांसाठीही याचा भविष्यात मोठा फायदा होईल, अशी माहिती नगरमधील कॅन्सर सर्जन डॉ. सतीश सोनवणे यांनी दिली.

डॉ. सोनवणे यांनी सांगितले, कॅन्सरवर आताच्या काळातही प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. गुद्द्वाराच्या कॅन्सरच्या दुसऱ्या तिसऱ्या स्टेजमध्ये केमोथेरपी, रेडिएशननंतर शस्त्रक्रियेचे नियोजन केले जाते. परंतु, स्लोन मेमोरियल केटरिंग कॅन्सर सेंटरने १२ रूग्णांना चाचणीसाठी निवडून त्यांना डॉस्टारलिमॅब हे इंजेक्शन दिले. ५०० एमजीचे डोस दर तीन आठवड्यांनी देण्यात आले. एका रुग्णाला एकूण ९ डोस देण्यात आले. डॉस्टारलिमॅब हे औषध पीडी १ इन्हिबिटल (इम्युनोथेरपी प्रोटोकॉल) आहे. संबंधित प्रयोगामध्ये सहभागी झालेल्या सर्व १२ रुग्णांना गुदाशयाच्या कॅन्सरने ग्रासले होते.

उपचारांच्या परिणाम असा झाला की या सर्वच्या सर्व रूग्णांचा कॅन्सर पूर्णपणे नष्ट झाला. शारीरिक तपासणीमध्ये त्यांच्या शरीरामध्ये सध्या कॅन्सरचा कुठलाही ट्यूमर सापडलेला नाही. एंडोस्कोपी, पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी किंवा पीईटी स्कॅन, एमआरआय स्कॅनच्या माध्यमातून चाचण्या करण्यात आल्यानंतरही त्यांच्या शरीरामध्ये कॅन्सरचा ट्यूमर आढळून आला नाही. क्लिनिकल चाचण्या थोड्या रूग्णांवर घेण्यात आल्या. त्यामुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणात चाचण्या, संशोधन आणि अभ्यास आवश्यक आहे. कॅन्सरच्या इतिहासात असा आशादायी व सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.

क्लिनिकल ट्रायलमध्ये सहभागी झालेल्या १२ रूग्णांवर ही चाचणी सुरु होण्याआधी केलेल्या कॅन्सरच्या उपचारांदरम्यान केमोथेरपी, रेडिएशन आणि शस्त्रक्रीयांसारख्या उपचार करुन बघितले होते. यामध्ये कधी कधी संडासमार्ग पोटावरुन काढावा लागतो, याला स्टोमा म्हणतात. उपचारादरम्यान रुग्णांना आतडी, मूत्रपिंड आणि लैंगिकतेसंदर्भातील समस्या निर्माण होऊ शकतात. आश्चर्याची बाब म्हणजे पहिल्याच टप्प्यात डॉस्टरलिमॅबमुळे हे रूग्ण कर्करोगमुक्त झाले आणि त्यांना पुढील उपचारांची आवश्यकता लागली नाही. तसेच संबंधित साईड इफेक्टही फार कमी दिसून आले. अशा नवनवीन संशोधनामुळे ऑर्गन प्रिझर्व्हेशन प्रोटोकॉल (कर्करोगामध्ये अवयव वाचविणे) ला बळकटी मिळू शकेल, असे डॉ. सोनवणे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com