पावणे तेरा लाख बालक अन् विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या डोस

उद्या मोहिम : पावणे चौदा लाख गोळ्यांचा पुरवठा
पावणे तेरा लाख बालक अन् विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या डोस

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम 25 एप्रिलला जिल्ह्यातील ग्रामिण व शहरी कार्यक्षेत्रामध्ये 5 हजार 679 अंगणवाडी केंद्रातून 3 लाख 36 हजार 178 लाभार्थ्यांना तसेच 5 हजार 178 शासकिय, अनुदानित व खाजगी शाळांमधून 9 लाख 37 हजार 658 शालेय विद्यार्थ्यांना असे एकूण 12 लाख 73 हजार 836 लाभार्थ्याना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. यासाठी राज्यस्तरावरुन 13 लाख 78 हजार जंतनाशक गोळयांचा पुरवठा करण्यात आलेला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात 1 ते 14 वयोगटातील अंदाजे 28 टक्के मुलांना आतडयामध्ये वाढणारे परजीवी जंतापासून धोका आहे. आतड्यांतील कृमी दोष हा बालकांमध्ये व किशोरवयीन मुला मुलींमध्ये होणार्‍या रक्तक्षय व कुपोषणास मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे. यामुळे मुला मुलींच्या शिक्षणावर व पुढील आयुष्यातील मिळकतीवर याचा विपरीत परिणाम होतो. तीव्र प्रमाणात कृमी दोष असलेले विद्यार्थी हे बरेचदा आजारी असतात.

त्यांना लवकर थकवा येतो व अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करु शाकत नाही. यामुळे बरेचदा शाळेत अनुपस्थित असतात. आतड्यांतील कृमी दोष हे वैयक्तीक व परिसर अस्वच्छतेमुळे होतात. बालकांमध्ये याचा प्रसार दुषित मातीद्वारे फार सहजतेने होतो. शाळा व अंगणवाडी पातळीवरुन देण्यात येणारी जंतनाशक गोळी ही फार परिणामकारक आहे.

राष्ट्रीय जंत नाशक मोहिमेचा उद्देश 1 ते 19 वयोगटातील सर्व मुला मुलींना अंगणवाडी, शाळा या ठिकाणी जंत नाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे. तसेच पोषणस्थिती, शिक्षण व जिवनाचा दर्जा उंचावणे हा आहे. मोहिमेच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालये, नगरपालिका दवाखाने व महानगरपालिका येथील सर्व वैदयकिय अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. राष्ट्रीय जंत नाहाक दिन 25 एप्रिल या दिवशी शाळेमधील 6 वर्ष ते 19 वर्ष वयोगटातील सर्व मुलां-मुलींना तसेच अंगणवाडी केंद्रामध्ये 1 ते 6 वर्ष वयोगटातील सर्व मुलांमुलींना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.

जे लाभार्थी या दिवशी आजारी असेल किंवा इतर कारणामुळे गोळी घेणे शक्य झाले नाही, त्यांना 29 एप्रिला शाळा व अंगणवाडी केंद्रामध्ये गोळी देण्यात येणार आहे. या मोहिमेत अल्बेन्डोझोल 400 मिली ग्रॅम ही गोळी चावून खाण्यास देण्यात येईल. त्यातही एक ते दोन वर्षे वय असलेल्या बालकास अर्धी गोळी (200 मिली ग्रॅम) पावडर करुन पाण्यात विरघळून, तर दोन ते तीन वर्षे वयाच्या बालकास एक गोळी ( 400 मिली ग्रॅम) पावडर करुन पाण्यात विरघळून देण्यात येईल. गोळी घेतांना बालकाने नाश्ता अथवा जेवण केळेले असणे आवश्यक आहे.

या मोहिमेचा 1 ते 19 वर्ष वयोगटातील अंगणवाडी, शाळेय विदयार्थी व शाळाबाहय मुले-मुली यांनी जंतनाऱहक गोळी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संजय घोगरे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.