समाधानकारक पावसाशिवाय पेरणी नको!

खरीप हंगामपूर्व कामे अंतिम टप्यात, आता मान्सूनची प्रतिक्षा
समाधानकारक पावसाशिवाय पेरणी नको!

राहाता (तालुका प्रतिनिधी)

शेतीची खरीप हंगामपूर्व कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. आता शेतकऱ्यांना मान्सूनची प्रतिक्षा लागली आहे. यंदा सरासरी ९५ टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवमान अभ्यासक पंजाब डख यांनीही पावसाचा अंदाज वर्तविला आहे. राज्यात १ ते ४ जून या दरम्यान पाऊस पडेल, असा डख यांनी अंदाज वर्तविला आहे.

राज्यातील नगरसह कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, जालना, औरंगाबाद, वैजापूर असा भाग बदलत पाऊस पडणार आहे. तर ७, ८, ९ जून दरम्यान राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. गेल्या तीन वर्षापासून पावसाची स्थिती चांगली राहिली आहे. बिगर मोसमी पावसानेही इतरत्र हजेरी लावली आहे.

मान्सून आणि शेती या विषयावर बोलताना जलसंपदाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता तथा हवामानाचे जाणकार उत्तमराव निर्मळ म्हणाले, हवामान खात्याने यावर्षी केरळमध्ये मान्सून वेळेआधीच दाखल होऊन तो उर्वरित भागात वेळापत्रकापेक्षा आधी सहा ते सात दिवस धडकणार, असा अंदाज वर्तवला होता. महाराष्ट्र व लगतची राज्ये यावर्षी विक्रमी तापमानाचा अनुभव घेत असल्याने उन्हाळ्यातील काहीली कमी होईल, या आशेने सर्वांनाच आनंद झाला होता. पण आता मान्सून आलाय पण पाऊस कुठाय, असे म्हणायची वेळ आली आहे. हवामान खात्याकडील अंदाज हे थोडेसे उतावीळपणे दिले जातात, असेच अलीकडचे चित्र आहे. अशा अंदाजामुळे बी बियाणे, खते, शेअर मार्केट या क्षेत्राला तेजी येते. मात्र शेतकऱ्यांची फसवणूक होते.

गेल्या २० मे २०२२ पासून आरबी समुद्र आणि लगत असलेल्या हिंदी महासागराच्या पट्ट्यात हवेच्या दाबातील फरक (Isobar Gradient ) फारच कमी आहे. त्यामुळे तेथील वारे सुद्धा अति मंद वा बहुधा स्थिरच आहेत. जवळपास हजार किमी त्रिजेच्या परिघात हा पट्टा आहे. मान्सून आणणारे वारे दक्षिण गोलार्धातून विषुववृत्तापर्यंत आफ्रिका खंडाच्या दिशेने येतात परंतु विषुववृत्त ओलांडून उत्तर गोलार्धात येताना ते केरळ किनारपट्टीच्या दिशेने (Coriolis Effect) प्रवास करतात. तेच वारे भारतात मान्सून आणतात. याच वाऱ्याच्या मार्गात उपरोल्लेखित हवेच्या पट्टा स्थित आहे. त्यामुळे मान्सूनचे वारे त्या पट्ट्याला डावीकडून ओलांडून गुजरात मार्गे दिल्ली उत्तरप्रदेशकडे जात आहेत.

तर उजव्या बाजूने वळसा घेतलेले वारे केरळ श्रीलंका मार्गे बंगालच्या उपसागरातून बंगाल, बिहारकडे जात आहेत. साधारणपणे जुनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हीच स्थिती राहील असे चित्र आहे. आजचा मुंबईतील हवेचा दाब ७५५ आणि विषुववृत्तावर हवेचा दाब ७५८ मिलीबारच्या जवळपास असून जवळपास २२०० किमी अंतरात असलेला हा फरक नगण्य आहे. त्याचा परिणाम म्हणून मान्सून वाहुन आणणारे वारे अत्यंत कमकुवत आणि दुबळे आहेत. खरे म्हणजे २० मे पासून त्यांना अद्यापही बाळसे आलेच नाही. तसेच नजीकच्या काळात हवेच्या दाबात आमुलाग्र बदल होऊन चक्रीय वादळ सदृश्य परिस्थिती होईल, अशीही परिस्थितीही दिसत नाही.

त्यामुळे जोपर्यंत कोकणपट्टीसह मुंबई तसेच राधानगरी, शाहूवाडी, बावडा, महाबळेश्वर, भोर, मुळशी, मावळ, अकोले, इगतपुरी, त्र्यंबक, पेठ, सुरगाण्यात दखलपात्र पाऊस पडत नाही, तोपर्यंत अहमदनगर सारख्या पर्जन्यछायेतील जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी पेरणीचा मुळीच विचार करु नये. पूर्व मान्सूनचा पाऊस आहे की, मान्सूनचा पाऊस आहे याची सुद्धा या बदलत्या हवामानात खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. एखाद दुसऱ्या चुकार ढगांमुळे पाऊस पडला आणि त्यावर विसंबून पेरणी केली तर ती धोक्यात येईल. दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी ही खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हवामान खात्याच्या सात दिवसात पाऊस धडकणार यावर विसंबण्यापेक्षा प्रत्यक्षात पडु द्या! यावर विश्वास ठेवणे यथोचित होईल.

आरबी समुद्रालगतच्या हिंदी महासागरातील विषुववृत्तानजीक जवळपास एक हजार किमी त्रिजेच्या परिघातील हवेच्या दाबातील फरक (Isobar Gradient) अत्यंत कमी आहे हवेचा दाब मुंबईत ७५५ व आणि विषुववृत्तावर ७५८ मिलीबार आहे. या २२०० किमी अंतरातील हा फरक नगण्य आहे. त्यामुळे तेथील वारे मंद किंबहुना स्थिर आहेत. मान्सुनच्या मार्गातच हा पट्टा असल्याने मान्सुन साठी सध्याची परिस्थिती पहाता जुनचा दुसरा आठवडा उजाडेल. शेतकरी बांधवांनी समाधानकारक पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी करु नये अन्यथा दुबार पेरणीचे संकट ओढवेल.

उत्तमराव निर्मळ (सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com