
सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur
नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथे मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून सलाबतपूर गावात गेल्या
सात-आठ महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असून त्याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. सध्या सलाबतपूर गावात मोकाट कुत्र्यांची संख्या 300 पेक्षा जास्त आहे.
गावातील बहुतेक कुत्री नवीनच वाटतात. ही कुत्री आली कुठून? की कोणी आणून सोडली असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. जर आणून सोडली असतील तर स्थानिक प्रशासनाच्या ही बाब लक्षात कशी आली नाही? काही असले तरी ग्रामस्थांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गावाच्या प्रत्येक गल्लीत पंधरा-विस कुत्र्यांचा घोळका बसलेला असतो. आणि तोही रस्त्याच्यामध्ये बसत असल्याने नागरिकांना तसेच महिलांना दळणवळण करताना मोठ्याप्रमाणात अडचणी येत आहेत.
त्यातच अनेक कुत्री पिसाळलेली आहेत. त्यामुळे लहान मुले, नागरिकांवर तसेच पाळीव प्राण्यांवर प्राणघातक हल्लेही होत आहेत. गावाच्या ठराविक ठिकाणी, नदीच्या कडेला दिवसभराच्या मांस विक्रीनंतरची घाण आणून टाकतात. त्याठिकाणी नित्यनेमाने रात्रीच्यावेळी पन्नास-साठ कुत्री जमतात.
ती घाण खाण्याबरोबरच रस्त्यावरच विस्कटून टाकतात. हा विचित्र प्रकार मुख्य रहदारीच्या रस्त्यावरून होत असल्याने खुपच किळसवाणा वाटतो. मात्र स्थानिक प्रशासनाला याबाबत जराही सोयरसुतक नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी नसलेले प्रशासन हवेच कशाला? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
सध्या शेतीची कामे सुरू आहेत. त्यातच गेल्या सात महिन्यांपासून सर्वच शाळा बंद आहेत. त्यामुळे लहान मुले घरीच आहेत. त्यात मुलांना शेतात न्यावे तर बसायलाही कोरडी जागा शिल्लक नाही आणि घरी ठेवावे तर कुत्र्यांच्या हल्ल्याची भीती वाटते. या नागरिकांच्या द्विधा मनस्थितीवरून गावात कुत्र्यांची सध्या किती दहशत आहे याचा अंदाज येतो. तरी या गंभीर प्रश्नाबाबत प्रशासन कधी जागे होणार? आणि काय उपाययोजना करणार? असा सवाल ग्रामस्थांमधून होत आहे.