साईबाबा संस्थानच्या डॉक्टरांनी खाजगी कोविड सेंटरमध्ये सेवा देण्यास मनाई

साईबाबा संस्थानच्या डॉक्टरांनी खाजगी कोविड सेंटरमध्ये सेवा देण्यास मनाई

शिर्डी (शहर प्रतिनिधी)-

#साईबाबा संस्थानच्या #कोविड_सेंटरमध्ये एका महिन्यात सुमारे 90 रुग्णांचा मृत्यू झाला असून यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी संस्थानच्या कोविड रुग्णालयाची झाडाझडती घेतली असून कामात कसून करणार्‍या डॉक्टरांची गय केली जाणार नाही, असा सुचक इशारा दिला. तसेच कायम अथवा बंद पत्रावर असलेल्या डॉक्टरांनी खाजगी कोविड सेंटरमध्ये सेवा देऊ नये, असा आदेश दिला आहे. तरीही अनेक डॉक्टर खाजगी कोविड सेंटरवर जाऊन सेवा देत आपले खिसे भरत असल्याची चर्चा संस्थानच्या वैद्यकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे.

शिर्डी शहरातील साईबाबांच्या कोविड रुग्णालयात मागील महिन्यात कोविड रुग्णांच्या मृत्युचा रेशो वाढला असून याबाबत नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होत आहे. संस्थानच्या दोन्ही रुग्णालयातील डॉक्टर संस्थानच्या सेवेत असताना रुग्णांना हवी तशी सेवा न देता फक्त तात्पुरती मलमपट्टी केल्यागत कोविड रुग्णांसाठी काम करीत असल्याने संस्थांच्या कोविड सेंटरमधील रुग्णांचे आरोग्य साईबाबांच्या श्रद्धेने ठिक झाले आहे. साईबाबा संस्थानच्या कोविड रुग्णालयात सेवा देताना टंगळमंगळ करणारे अपवाद सोडले तर अनेक डॉक्टर खाजगी कोविड सेंटरमध्ये इमाने-इतबारे दर्जेदार सेवा पुरवत आहे. खाजगी कोविड सेंटरला सेवा देणार्‍या डॉक्टरांनी संस्थानच्या कोविड रूग्णालयात सुद्धा प्रत्येक रुग्णाला दर्जेदार वैद्यकीय सेवा व उपचार द्यावेत म्हणजे साईंवर असलेली श्रद्धा व सबुरी जपली जाईल. अन्यथा पैशाच्या हव्यासापोटी जर साई संस्थान रुग्णालयात येणार्‍या रुग्ण साईभक्तांना योग्य सेवा दिली नाही तर त्यांच्यावर बाबांचा दंड्या फिरल्याशिवाय राहणार नाही.

साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणार्‍या मुजोर व बेजबाबदारपणे वागणार्‍या वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांवर संस्थान प्रशासनाने आता कठोर व कडक कारवाई करून त्यांना धडा शिकवणे गरजेचे आहे, त्याचबरोबर नागरिकांनी सुद्धा साईबाबा संस्थानकडे डॉक्टर अथवा वैद्यकीय कर्मचारी म्हणून काम करत असताना बाबांच्या झोळीतून पगार घेत खाजगी रुग्णालयात पैशासाठी काम करणार्‍या वैद्यकीय अधिकारी अथवा कर्मचार्‍यांच्या तक्रारी व पुरावे साई संस्थानकडे देऊन आपण साईबाबांचे खरे भक्त सेवक असल्याचे दाखवून द्यावे तरच साईबाबा संस्थानच्या विविध विभागातील चुकीचे काम करणार्‍या अशा प्रवृत्तींना मोठा धडा बसेल.

बाहेरील खाजगी कोविड सेंटरमध्ये सेवा देणार्‍या साईबाबा संस्थानच्या दोन्ही रुग्णालयातील डॉक्टरांवर नजर ठेवण्यासाठी स्काँडची नेमणूक करण्यात आली आहे. साई संस्थानच्या डॉक्टरांनी प्रथम प्राधान्यक्रम साईबाबा हॉस्पिटलला दिले पाहिजे. डॉक्टरांच्या इन्सेन्टिव्हबाबत संस्थान प्रशासनाची सकारात्मक भुमिका असून न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.

-कान्हुराज बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, साईबाबा संस्थान.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com