
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
डॉक्टर असलेल्या विवाहितेचा सासरी 50 लाखांसाठी छळ केल्याची घटना समोर आली आहे. पीडितेला पतीसह सासू-सासर्यांनी घराच्या बाहेर काढून दिले. दरम्यान पीडित विवाहितेने याप्रकरणी 12 मार्च, 2023 रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून पती आशुतोष अशोक सावंत, सासरे अशोक हरीबा सावंत, सासू अश्विनी अशोक सावंत (सर्व रा. बंगलुरू, कर्नाटक) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावेडी उपनगरात राहत असलेल्या फिर्यादीचा विवाह लग्न जमवणार्या एका साईटवरून मे 2022 रोजी आशुतोष अशोक सावंत सोबत झाला होता. लग्नामध्ये फिर्यादीच्या वडिलांनी त्यांना व पतीला 21 तोळे सोन्याचे दागिने व 2 किलो चांदीची भांडी दिली होती. दरम्यान लग्नानंतर फिर्यादीचा सासरी बंगलुरू येथे व मुंबई येथे नोकरीला असलेल्या ठिकाणी पती व सासू-सासर्यांकडून शारीरीक व मानसिक छळ केला.
आई-वडिलांकडून घर घेण्यासाठी 50 लाख रुपये घेऊन ये असे म्हणत त्रास दिला. 26 ऑक्टोबर 2022 रोजी बंगलुरु कर्नाटक येथे घरी असताना फिर्यादीला पतीसह सासू-सासर्यांनी शिवीगाळ, मारहाण करून घराबाहेर काढले. तेव्हापासून फिर्यादी आई-वडिलांच्या घरी राहत होत्या. त्यांनी 12 मार्च, 2023 रोजी याप्रकरणी फिर्याद दिली असून पोलीस तपास करीत आहेत.