वांबोरीच्या बाधित डॉक्टरांनी दिला प्रशासनाला चकवा
सार्वमत

वांबोरीच्या बाधित डॉक्टरांनी दिला प्रशासनाला चकवा

बाधित असतानाही केली रुग्णांची तपासणी; वांबोरीकर धास्तावले

Nilesh Jadhav

उंबरे | वार्ताहर | Umbare

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील एका डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह निघाल्यामुळे वांबोरीकरांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे वांबोरी गाव पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.

दरम्यान, त्या बाधित झालेल्या डॉक्टरांनी आपला नगरचा पत्ता देऊन राहुरीच्या प्रशासनाला चांगलाच चकवा दिला. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर हे डॉक्टर महाशय स्थानिक प्रशासनासह तालुका प्रशासनाला चकवा देत नगरला उपचारासाठी निघून गेले. त्यांना बाधा झाल्याची खबर आल्यानंतर तालुका आणि स्थानिक प्रशासनाने त्यांचा शोध घेतला.

मात्र, ते पत्नीसह वांबोरीहून नगरला गेले. त्यांनी तेथे स्वतःला एका खासगी रुग्णालयात दाखल करून घेतले. त्यांचा कोणालाही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे प्रशासनाची धावपळ झाली.

कात्रड येथील करोनाबाधित निघालेला इसम वांबोरीतील याच डॉक्टरांकडे उपचारासाठी गेला होता. जेव्हा या कात्रडच्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, त्यानंतर त्याच्या संपर्कातील नऊजणांना ताब्यात घेण्यात आले. परंतु डॉक्टर महाशयांनी खासगी रुग्णालयात आपली तपासणी केली असता त्यांचा अहवाल शनिवार दि. 18 जुलै रोजी सायंकाळी पॉझिटिव्ह आला असल्याचा त्यांना फोन आला.

त्यावेळी त्यांनी कोणालाही काहीही माहिती न देता सायंकाळी ते व त्यांची पत्नी वांबोरीहून नगरला निघून गेल्याची माहिती मिळाली. प्रशासन मात्र, डॉक्टरांच्या अहवालाच्या प्रतीक्षेत होते. काल रविवारी डॉ. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष व पंचायत समितीचे सदस्य उदयसिंह पाटील, वांबोरीच्या सरपंच रोहिणीताई कुसमुडे, ग्रामविकास अधिकारी बी. के. गागरे, अधीक्षक भाऊसाहेब ढोकणे यांनी सखोल चौकशी केली असता डॉक्टर बाधित असून नगरला खासगी दवाखान्यात उपचार घेत असल्याचे समजल्यानंतर त्यांनी तातडीने प्रशासनाला कल्पना दिली व त्यापुढे प्रशासनाची झोप उडाली व धावपळ सुरू झाली.

डॉक्टर त्यांच्या पत्नीसमवेत वांबोरी गावात रहातात व त्याच ठिकाणी त्यांचे रुग्णालय सुरू असते. परंतु त्यांचा एक बंगला नगरला असल्याने ते अधूनमधून नगरला राहतात. मात्र, करोना स्त्राव तपासणीसाठी दिले त्यावेळी त्यांनी त्यावर नगरचा रहिवाशी असल्याचा पत्ता दिल्यामुळे शासकीय माहितीच्या यादीत ते नाव नगरच्या यादीत नोंद झाल्याने प्रशासन अंधारात राहिले.

डॉक्टरचे स्त्राव तपासणीसाठी दिले असतानाही त्यांनी शनिवार दि.18 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत रुग्णांची तपासणी केली, अशी माहिती मिळाली. त्यामुळे इतरांचा जीव धोक्यात घालण्याचे काम त्यांनी केले असल्याचा आरोप करून प्रशासनाने त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com