डॉ. सावंत यांच्या घरातून 15 लाखांच्या दागिन्यांची चोरी

डॉ. सावंत यांच्या घरातून 15 लाखांच्या दागिन्यांची चोरी

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

शहरातील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गिरीश सावंत यांच्या नवीन नगर रोडवरील ताजणे मळ्यातील घरातून 15 लाख 78 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. ही घटना बुधवार दि. 6 सप्टेंबर रोजी उघडकीस आली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावंत दाम्पत्य बाहेरगावी गेले होते, याचा गैरफायदा घेऊन चोरट्याने ही चोरी केली आहे. या चोरट्याने डॉ. सावंत यांच्या घरातील कपाटात ठेवलेले विविध प्रकारचे 15 लाख 78 हजार रुपये किमतीचे 526 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. या दागिन्यांमध्ये कलकत्ता मंगळसूत्र, कॉलर नेकलेस, पॅण्डल, राधेय नेकलेस, स्टड इयर रिंगस, गळ्यातील चेन, गळ्यातील वाट्या मणी व सोन्याचे क्वॉईन यांचा समावेश आहे.

डॉ.सावंत हे बुधवारी संगमनेरात परतल्यानंतर घरातील दागिन्यांची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 786/2023 भारतीय दंड संहिता 454, 457, 380 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव करत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com