केंद्र सरकार भांडवलदारांच्या पाठीशी - डॉ. भामरे

काँग्रेसच्यावतीने मार्केट यार्ड परिसरात धरणे आंदोलन
केंद्र सरकार भांडवलदारांच्या पाठीशी - डॉ. भामरे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केंद्र सरकार हे मुठभर भांडवलदारांच्या पाठीशी आहे. केंद्र सरकारने शेतकरी, कामगार विरोधी केलेले

कायदे हे या घटकांना देशोधडीला लावणारे असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे अहमदनगर शहर जिल्हा निरीक्षक डॉ. अनिल भामरे यांनी केला.

अहमदनगर शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी शेतकरी, कामगार बचाव दिवस पाळण्यात आला. यानिमित्त मार्केट यार्डमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करत निदर्शने केली.

यावेळी डॉ. भामरे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, दीप चव्हाण, तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गुंजाळ, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब हराळ, अज्जू शेख, अक्षय कुलट, प्रवीण गीते, शानु शेख, जयंत वाघ, शिल्पा दुसुंगे, शरद ठोंबरे, दानिश शेख, मुबीन शेख, अन्वर सय्यद, दीपक घाडगे, योगेश काळे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रताप शेळके म्हणाले, या आंदोलनाची तीव्रता आम्ही वाढवत नेणार आहोत, आगामी काळामध्ये जिल्हा परिषद गट, त्याचबरोबर पंचायत समिती गण स्तरावरती शेतकरी रस्त्यावर उतरून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंदोलन करतील. किरण काळे म्हणाले, या देशातील भांडवलदार शेतकर्‍याच्या बांधावर जाऊन कवडीमोल किमतीने माल विकत घेवुन मजबूरी मध्ये सापडलेल्या शेतकर्‍यांचे शोषण करतील.

कामगार विरोधी कायद्यामुळे भांडवलशाही राज्य या देशात येताना दिसते आहे. जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे म्हणाले, शेती हा आपल्या देशाचा कणा आहे. हा कणाच मोडून काढण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. काँग्रेस पक्ष हा या देशातल्या शेतकरी, कामगार, बेरोजगार युवक, महिला, गोरगरीब, सामान्य घटकांचा खरा आवाज आहे. या सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरून केंद्राला इशारा देत आहे.

घोषणाबाजी व कार्यकर्त्याचे प्रतिकात्मक मुंडन

उत्तर प्रदेशात हाथरस मध्ये अत्याचारात बळी गेलेल्या पिडीत युवतीला न्याय मिळावा अशी मागणी यावेळी काँग्रेस पक्षाच्यावतीने सर्व नेत्यांनी आपल्या भाषणात केली. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्याबरोबर करण्यात आलेली गैरवर्तणूक, तसेच राहुल गांधींना केलेली धक्काबुक्की याचा तीव्र निषेध करणार्‍या तसेच मोदी - योगी, हाय- हायच्या घोषणा यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसचे अन्वर सय्यद यांनी मोदी - योगी सरकारच्या निषेधार्थ मुंडन केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com