औषधे, इंजेक्शनबाबत रुग्णाशी चर्चा नको

औषधे, इंजेक्शनबाबत रुग्णाशी चर्चा नको

तहसीलदार कुंदन हिरे : रुग्णालयांना दिल्या सूचना

शिर्डी (प्रतिनिधी) - कोविड सेंटरमध्ये काम करणार्‍या डॉक्टर्स किंवा वैद्यकीय कर्मचार्‍यांनी अ‍ॅडमिट असलेल्या रुग्णांबरोबर औषधे, इंजेक्शन, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडबाबत चर्चा करण्याऐवजी त्याच्या जवळच्या नातेवाइकांशी बोलावे, अशा सूचना राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिल्या आहेत.

करोनाचा उपचार घेत असलेल्या रुग्णांना अनेक डॉक्टर्स, नर्सेस ते गंभीर असल्याचे, त्यांना रेमडेसिवीर, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटरची आवश्यकता असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे रुग्ण पुरते खचून जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेकदा रुग्णासमोरच तो गंभीर असल्याची चर्चा करण्यात येत असते. याचा परिणाम रुग्णाचे मनोबल तुटण्यात होऊ शकतो.

या पार्श्‍वभूमीवर डॉक्टर्स, नर्सेस अथवा वैद्यकीय कर्मचार्‍यांनी या सर्व बाबींसाठी रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांशी चर्चा करावी. त्यासाठी रुग्णाला दाखल करून जवळच्या नातेवाइकांचा मोबाईल घ्यावा, दाखल असलेल्या रुग्णाचे वारंवार समुपदेशन करून त्याला धीर द्यावा, त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न प्रशासनाने सुरू केलेल्या दिलासा उपक्रमाची मदत घ्यावी, अशा सूचना तहसीलदार कुंदन हिरे यांनी तालुक्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत.

औषधे, इंजेक्शनची थेट मागणी केल्यास किंवा ऑक्सिजन, व्हेंटिबेडबाबत चर्चा करून त्याच्या मनात भीती निर्माण केल्यास कारवाई करण्याचा इशाराही हिरे यांनी दिला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com