
नेवासा |शहर प्रतिनीधी| Newasa
जगाला ज्ञानाचा संदेश देणार्या माऊलींच्या मुखकमलातून जे ज्ञानामृत बाहेर पडले आहे त्यास 733 वर्षे पूर्ण होत असल्याने तर शांतीब्रम्ह एकनाथ महाराजांनी संशोधित केलेल्या ज्ञानेश्वरीला 439 वर्षे पूर्ण होत असल्याने मिरवणूक, दीपोत्सव, पारायण व आरती सोहळ्याचे नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे यावेळी अवघ्या 3 मिनिटांत ज्ञानेश्वरी पारायण वाचन करण्यात आले नी नऊ हजार 33 दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला.
हा सोहळा श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान व रामेश्वर महाराज कंठाळे तसेच वारकरी संप्रदाय यांनी आयोजित केला होता. या सोहळ्याची इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. त्याचे प्रमाणपत्र देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, विश्वस्त व रामेश्वर महाराज कंठाळे यांना डॉ. दीपक हरके यांच्याहस्ते ओम शांती केंद्राच्या उषा दिदी यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्या आधी दुपारी 4 वाजता संत ज्ञानेश्वर मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली श्री संत तुकाराम महाराज मंदिर, लोखंडे गल्ली, मारुती मंदिर, श्रीमोहिनीराज मंदिर, श्रीखोलेश्वर गणपती मंदिर मार्गे मिरवणूक श्री ज्ञानेश्वर मंदिरात आली असता ज्ञानोबा माऊलीचा जयघोष करण्यात आला.
ज्ञानेश्वर महाराज मंदिरात आयोजित या सोहळ्यात 903 भक्तांचा सहभाग होता.सर्वात कमी वेळेत पारायण होण्यासाठी एका भक्तावर ज्ञानेश्वरी ग्रंथातील दहा ओव्या व दहा दिवे प्रज्वलित करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. 903 भक्तांनी नऊ हजार 33 ओव्यांचे पठन केले. या करीता सत्तावीस गट तयार केले होते.
अध्यायानुसार बैठक व्यवस्था
ओम श्री परमात्मेरनमा म्हणून एकाच वेळी सर्व भाविकांनी त्यांना दिलेल्या ओवीचे वाचन केले. अवघ्या 3 मिनिटात संपूर्ण ज्ञानेश्वरी पारायण पूर्ण होवून कमी वेळेत पारायण पूर्ण होण्याचा विक्रम करण्यात आला. आरती करण्यात आली व पसायदान झाले. या अपूर्व सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढील वर्षी नऊ हजार तेहतीस दिवे प्रज्वलित करायचे एका व्यक्तीने एकच दिवा लावायचा व एका व्यक्तीने एकच ओवी पाठ करायची.पंचेचाळीस सेकंदात ज्ञानेश्वरी पारायण पूर्ण करण्याचा असा विश्व विक्रम करायचा असा संकल्प उपस्थित भाविकांनी केला.
श्री क्षेत्र नेवासे व श्री क्षेत्र पैठण येथील पंचक्रोशीतील शाळा, विविध संस्था, संघटना, वारकरी संप्रदाय यांना ग्रंथजयंतीचे महत्व पटवून दिले. सर्वच गावांनी ग्रंथजयंती उत्साहाने साजरी करू असे सांगितले व नियोजन केले. नेवासा तालुक्यात 16 गावांनी तर पैठण तालुक्यात 7 गावांनी जयंती करण्याचे नियोजन केले.
ज्ञानेश्वरीची विश्वविक्रमात नोंद
माऊलींच्या भूमीतील ऐतिहासिक सोहळ्याची दखल इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड्सने घेतली असून संस्थेचे आंतरराष्ट्रीय सचिव डॉ.दीपक हारके यांनी ज्ञानेश्वरी पारायण विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र आयोजकांना दिले.