दिवाळीच्या खरेदीसाठी सोनईची बाजारपेठ गजबजली

दिवाळीच्या खरेदीसाठी सोनईची बाजारपेठ गजबजली

सोनई |वार्ताहर| Sonai

दोन दिवसांवर दिवाळी आली असून करोना संसर्ग कमी झाल्यानंतर नागरिकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. विविध सवलतींद्वारे विक्रेते ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. व्यापार्‍यांनी रस्त्यावर स्टॉल लावल्यामुळे रस्त्यावर गर्दी वाढली आहे.

शहरातील बस स्थानक रस्त्यांबरोबर इतर महत्त्वाच्या महावीर पेठ, नवी पेठ, छत्रपती शिवाजी महाराज रोड, राहुरी रोड या ठिकाणी कपडे, आकाशकंदील, फटाके, पणती, रांगोळी, सुगंधी तेल आदींचे स्टॉल मोठ्या प्रमाणात उभारले आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोठी खरेदी, विविध प्रकारचे गोडधोड आणि आनंद द्विगुणीत करणारा सण म्हणजे दीपावली. या काळात शहरात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. विविध प्रकारचे तयार कपडे, बालगोपालांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस, विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य, किराणा दुकान, फराळाचे साहित्य, मिठाईची दुकाने, अत्तर, फटाके, आकाशकंदील, पूजेचे साहित्य, रांगोळ्या आदी विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले असून मुख्य रस्त्यांवर गर्दी वाढत आहे.

त्यामुळे शहराला यात्रेचे स्वरूप आले आहे. बाजारपेठ दिवाळीच्या स्वागतासाठी गत सप्ताहापासून सज्ज झाली होती. कपडे व्यापार्‍यांनी दिवाळीचा ट्रेन्ड बघून त्यानुसार आधुनिक स्टाईलचे पेहराव बाजारपेठेत आणले आहेत. बसस्थानक परीसर व संभाजी चौकात झाडू, लक्ष्मी मुर्ती, पणत्या विक्रेते दाखल झाले आहेत. विविध आकारातील आकर्षक पणत्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

करोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे मोबाईल, टीव्ही, वॉटर प्युरिफायर, आटा चक्की, मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन, फ्रीज आदी घरगुती वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहक फायनान्सला पसंती देत आहेत.

- सुधिर दरंदले इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रेता

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com