दिवाळीला मिळणार रवा, चणाडाळ, साखर, तेल, मैदा व पोहे

आनंदाचा शिधा || पुरवठा विभागाचे नियोजन
दिवाळीला मिळणार रवा, चणाडाळ, साखर, तेल, मैदा व पोहे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दरवर्षीप्रमाणे यंदाही शासनाकडून शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. यंदा या किटमध्ये दिवाळीसाठीच्या सहा वस्तू आहेत. दिवाळीआधीच म्हणजे 10 नोव्हेंबरपर्यंत हा शिधा वाटप करण्याचे नियोजन पुरवठा विभागाने केले आहे.

दरवर्षी शासनाकडून दिवाळीत आनंदाचा शिधा रेशन कार्डधारकांना दिला जातो. यंदा मात्र तो गणेशोत्सवातही देण्यात आला. आता दिवाळीचा शिधा देण्याचे नियोजन सुरू आहे. गणपतीसाठी 100 रुपयांत एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल या किटमध्ये देण्यात आले होते. आता दिवाळीच्या शिधामध्ये मैदा व पोहे या दोन वस्तू वाढविण्यात आल्या आहेत. परंतु त्या अर्धा किलोने कमी झाल्या आहेत. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात दारिद्य्र रेषेवरील तसेच केशरी शिधापत्रिकाधारकांना हा शिधा मिळेल.जिल्ह्यातील सुमारे पावणेसात लाख शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणार आहे.

दरम्यान, गणपतीचा शिधा जनतेपर्यंत वेळेवर पोहोचला नाही. किटमध्ये काही वस्तू कमी आल्या, अशा तक्रारी पुरवठा विभागाकडे नागरिकांनी केल्या. त्याची चौकशी करण्याच्या सूचना पुरवठा विभागाने दिल्या आहेत शिवाय दिवाळीच्या शिधा वाटपात या त्रुटी राहणार नसल्याची खबरदारी पुरवठा विभाग घेत आहे. आनंदाचा शिधा जिल्हा पुरवठा विभागाकडून दिवाळीआधीच म्हणजे 10 नोव्हेंबरपर्यंत हा शिधा वाटप करण्याचे नियोजन आहे.

पावणेसात लाख लाभार्थ्यांना लाभ

जिल्ह्यातील 80 हजार अंत्योदय लाभार्थी, तसेच 6 लाख प्राधान्य कुटुंब लाभार्थी अशा सुमारे पावणेसात लाख लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. पुरवठादाराकडून तालुकास्तरावर पुरवठा झाल्यानंतर त्याचे किट करून ते लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.

100 रुपयांत मिळणार सहा वस्तू

आनंदाचा शिधा या किटमध्ये 1 किलो साखर, 1 किलो खाद्यतेल, तसेच रवा, चणाडाळ, पोहे व मैदा या चार वस्तू प्रत्येकी अर्धा किलो देण्यात येणार आहेत. अशा 6 वस्तूंची किट 100 रुपयांत मिळणार आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com