अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
करोना लसीकरणातील नियोजनाच्या अभावावरून विभागीय उपायुक्त गोरक्षनाथ गाडीलकर यांनी महापालिका प्रशासनाला खडेबोल सुनावले. महापालिकेची बदनामी खूप झाली, आता पुरे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, या शब्दांत गाडीलकर यांनी महापालिका प्रशासनाला खडसावले.
गाडीकलकर यांनी आज नगर शहरातील लसीकरण केंद्र व कोवीड केंद्राला भेट देत तेथील कामाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी नियोजनाचा सल्लाही प्रशासनाला दिला. महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त शंकर गोरे, सभागृहनेते रवींद्र बारस्कर, महापालिका आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ.सागर बोरुडे, माजी नगरसेवक निखिल वारे, सचिन जाधव, सतीश शिंदे, बाळासाहेब पवार, आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे तसेच आरोग्य केंद्रातील डॉक्टर उपस्थित होते.
शहरातील 25 नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला आहे. त्यातील 5 हजार नगरकरांचा दुसरा डोस पूर्ण झाला. लसीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी संबंधितांना मेसेज, फोनद्वारे कळविण्याची सुविधा निर्माण करा. लसीकरण केंद्रात वशिलेबाजी चालणार नाही, याची जबाबदारी केंद्र प्रमुखांनी घ्यावी, तसे झाल्यास त्यांची नोंद करून वरिष्ठांना कळवावी, अशी सूचना विभागीय उपायुक्त गोरक्षनाथ गाडीलकर यांनी केली. नगर महापालिकेला लसीकरणाचा कोटा वाढवून मिळावा तसेच टेस्टिंग व संसर्ग थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याची सुचनाही त्यांनी केली.
लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी उपाययोजनाही त्यांनी प्रशासनाला सांगितल्या. अगोदरच्या दिवशी लसीची किती डोस दिले जातील त्याची संख्या आणि लस लाभार्थ्याची यादी बोर्डवर लावावी. लसीकरणातील वशिलेबाजी बंद करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा. कोणी दादागिरी करून लसीकरणासाठी दबाव आणत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. एका दिवशी एकाच कंपनीची लस सर्व केंद्रावर दिली जावी. ज्यांना लस देणार आहेत, त्यांना मोबाईलवर मेसेज किंवा फोन करून कळवा. म्हणजे इतर लोक येणार नाहीत.
वशिलेबाजी करणार्यांवर गुन्हे
लसीकरण केंद्रात लस देण्यासाठी कोणी दादागिरी करून बळजबरी करत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. ही जबाबदारी केंद्र प्रमुखाचे आहे. पोलिस ठाण्यातील डायरीसारखी डायरी केंद्रात ठेवा. त्यात लसीसंदर्भातील अडचणी, वशिलेबाजी, दबाव, कर्मचार्यांचा हलगर्जीपणा याच्या नोंदी करा. तशी तक्रार वरिष्ठांकडे करा. पोलीस पाच मिनिटात मदतीला पोहचतील, असे सांगत वशिलेबाजी चालणार नाही, असा इशारा गाडीलकर यांनी दिला.
काय म्हणाले गाडीलकर
- केंद्राबाहेर उद्या लस डोसची संख्या आणि लाभार्थ्यांची यादी लावा
- लाभार्थ्यांना मेसेज किंवा फोनवरून माहिती द्या
- वशिलेबाजी करणार्यांवर गुन्हे नोंदवा
- 25 नगरकरांना पहिला डोस
- 5 हजार नगरकरांचा दुसरा डोस पूर्ण
- केंद्रप्रमुखांनी डायरीत नोंदी करून वरिष्ठांना कळवावे