नैसर्गिक शेती शेतकर्‍यांसाठी फायदेशीर - विभागीय आयुक्त गमे

राहुरी विद्यापीठात मागोवा-2021 उत्साहात
नैसर्गिक शेती शेतकर्‍यांसाठी फायदेशीर - विभागीय आयुक्त गमे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

शेतीचा खर्च कमी कसा करता येईल? यावर संशोधन झाले पाहिजे. शहरातील लोकांची आरोग्याविषयीच्या जागरूकतेचा फायदा सेंद्रिय शेती करणार्‍या शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. याकरीता बाजारपेठेचा विचार केला तर सेंद्रिय तसेच नैसर्गिक शेती शेतकर्‍यांना फायद्याची होईल, असे प्रतिपादन नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात मागोवा-2021 या हायब्रीड मोडमध्ये आयोजित कार्यक्रमात उद्घाटनपर भाषणात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महात्मा फुुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पद्मश्री पोपटराव पवार, बीजमाता पद्मश्री सौ. राहिबाई पोपेरे, अन्नमाता सौ. ममताबाई भांगरे, डॉ. शरद गडाख, डॉ. प्रमोद रसाळ, डॉ. दिलीप पवार, सुखदेव बलमे उपस्थित होते.

गमे म्हणाले, कृषी संशोधनाबाबत विकेल ते पिकेल याचा उपयोग करुन लोकांना संशोधनात काय पाहिजे? याचा विचार करणे गरजेचे आहे. विद्यापीठांनी मोठ्या प्रमाणावर ब्रिडर बियाणे तयार केल्यास त्याचा फायदा बियाणे संशोधन करणार्‍या संस्थांना होईल. कुलगुरु डॉ. पाटील म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कार्य अतिशय मोलाचे आहे. विद्यापीठातून पदवी घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी कृषीक्षेत्रात उद्योजक बनून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. उत्कृष्ट पध्दतीने शेती करणार्‍या शेतकर्‍यांचा व कृषी उद्योजकांचा आपण प्रत्येक महिन्यात पोस्टरद्वारे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात प्रसिध्दी देऊन त्यांचा सन्मान करण्याची प्रथा विद्यापीठात सुरू केली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे योगदान ग्रामिण भागाबरोबरच बियाणे इंडस्ट्री, अन्न तंत्रज्ञान, मशीनरी इंडस्ट्री, प्रशासन तसेच परदेशातील फलोत्पादन व लॅडस्केप गार्डनींग यासारख्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. शेतीतील प्रयोगशील शेतकर्‍यांच्या तंत्रज्ञानाचा अंतर्भाव विद्यापीठाच्या संशोधनात व्हायला हवा, तरच शेतीतील मजुरांचा प्रश्न सुटण्यास मदत हाईल. यावेळी पोपटराव पवार व सौ. राहिबाई पोपेरे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्यावतीने पोपटराव पवार व सौ. राहिबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सौ. ममताताई भांगरे यांना सेंद्रिय शेतीमध्ये केलेल्या कामाबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने विद्यापीठाचे कृषीदर्शनी-2022 व कृषी दिनदर्शिका-2022 चे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक डॉ. शरद गडाख यांनी केले. डॉ. प्रमोद रसाळ यांनी शिक्षणाचा आढावा, कुलसचिव डॉ. दिलीप पवार यांनी प्रशासनाचा आढावा, वित्त विभागाचा आढावा सुखदेव बलमे यांनी सादर केला.

याप्रसंगी डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. मिलिंद अहिरे आणि विभाग प्रमुख उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. आनंद सोळंके यांनी केले तर आभार डॉ. पंडित खर्डे यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com