चौकशी सुरू, निष्कर्षापर्यंत पोहचणे बाकी

आयुक्त गमे : समितीच्या हाती प्राथमिक माहिती || जिल्हा रुग्णालय आगप्रकरण
चौकशी सुरू, निष्कर्षापर्यंत पोहचणे बाकी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा रुग्णालयातील आग प्रकरणी चौकशी समितीने तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांसह सार्वजनिक बांधकाम, विद्युत, मनपा विभागातील अधिकार्‍यांना एक अहवाल भरून देण्यास सांगितला होता. तो संबंधित अधिकार्‍यांनी सादर केला. या अहवालानुसार समितीकडे प्राथमिक माहिती आली आहे. यामध्ये काही मुद्दे बाकी आहे. अंतिम माहिती आल्यानंतर अभ्यास करून कारवाईसाठी निष्कर्ष काढला जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्त तथा चौकशी समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

जिल्हा रुग्णालयातील आगप्रकरणी 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. याची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. विभागीय आयुक्त गमे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली आहे. राज्य सरकारमधील तज्ञ लोकांचा या समितीमध्ये सहभाग आहे. समितीच्या काही सदस्यांनी घटनेची माहिती घेतली आहे. गुरूवारी आयुक्त गमे नगरमध्ये आले होते. त्यांनी घटनेशी संबंधीत विविध विभागाच्या अधिकार्‍यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलविले होते.

आयुक्त गमे म्हणाले, याप्रकरणी अजून चौकशीच चालू आहे, संपूर्ण चौकशी होण्यास अजून आठ ते दहा दिवस लागतील. समितीचे सर्व सदस्य घटनेविषयी चौकशी करण्यासाठी नगरमध्ये आले आहे. घटनेशी संबंधीत विविध विभागाच्या अधिकार्‍यांना एक अहवाल भरून देण्यास सांगितला होता. तो संबंधित अधिकार्‍यांनी सादर केला. यामध्ये प्राथमिक माहिती आली आहे. अजून बरेच मुद्दे येणे बाकी आहे, ते सोमवारपर्यंत सादर करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. आलेल्या माहितीवर समितीचे सर्व सदस्य अभ्यास करत आहेत. सर्व माहिती प्राप्त झाल्यानंतर अभ्यास करून कारवाईसाठी निष्कर्ष काढला जाईल, असे ते म्हणाले. घटनेप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलीस स्वतंत्र कारवाई करत आहे. चौकशी समिती त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही. त्याचबरोबर चौकशी समितीमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या समावेश नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान या समितीला सात दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज विभागीय आयुक्त नगरमध्ये होते. राज्य सरकारमधील मंत्र्यांनी या घटनेची चौकशी चालू आहे, अशी सुरुवातीला कारणे दिली. त्याच पद्धतीने विभागीय आयुक्त गमे यांनी आज पत्रकारांशी बोलताना चौकशी चालू आहे, असे सांगितले. या आगीच्या घटनेला आज सहा दिवस होत आहे. तरीदेखील घटनेची राज्य सरकारने नेमलेल्या समितीकडून अजून चौकशीच चालू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com