जिल्ह्यात आजपासून करोना अ‍ॅण्टीबॉडीजची तपासणी

जिल्ह्यात आजपासून करोना अ‍ॅण्टीबॉडीजची तपासणी

400 व्यक्तींची होणार चाचणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील नागरिकांमध्ये करोना विरुद्ध लढण्यासाठी अ‍ॅण्टीबॉडीज विकसित झाल्यात किंवा नाही, याची चाचणी करण्यासाठी आजपासून सिरोसर्वे (अ‍ॅण्टीबॉडिज तपासणी) केला जाणार आहे. यात सहा ते 17 वर्षे वयोगट आणि अठरा ते त्यापुढील वयाच्या 400 व्यक्तींची चाचणी करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भोसले यांनी गुरूवारी तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून करोना उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, पल्लवी निर्मळ, रोहिणी नर्हे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे हे जिल्हा मुख्यालय तर उपविभाग, तालुकास्तरावरील महसूल, पोलीस, ग्रामविकास, आरोग्य आणि नगरविकास विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

सध्या जरी रुग्णसंख्येत काहीशी घट दिसून येत असली तरी संसर्गाचा धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करावे. तालुकास्तरीय यंत्रणांनीही या नियमांचे पालन करीत नसलेल्या व्यक्ती आणि आस्थापनांवर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिले. मोठ्या प्रमाणात गर्दी जमवणारे कोणतेही कार्यक्रम, लग्न समारंभ, सोहळे शक्यतो टाळावेत अथवा कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करुन परवानगी दिलेल्या मर्यादेतच करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी भोसले त्यांनी जिल्हावासियांना केले आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील नागरिकांत करोना विषाणू विरुध्द लढण्यासाठी अ‍ॅण्टीबॉडीज तयार झाल्यात किंवा नाहीत, याचा अभ्यास करण्यासाठी आजपासून जिल्ह्यात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) वतीने सिरोसर्वे केला जाणार आहे. जिल्ह्यातील विविध गावांतील आणि विविध वयोगटातील 400 जणांची चाचणी यासाठी केली जाणार आहे. यापूर्वी जिल्ह्यात तीन वेळा सिरोसर्वे करण्यात आला होता, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे सिरे सर्वेलन्स अधिकारी डॉ. चेतन खाडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली. यापूर्वी झालेल्या सर्वेमध्ये मुलांची चाचणी केली गेली नव्हती. या सर्वेमध्ये सहा ते 17 वर्षे वयोगट आणि अठरा ते त्यापुढील वयाच्या व्यक्ती यांची तपासणी करुन त्यांच्यामध्ये अ‍ॅण्डीबॉडीज विकसित झाल्यात किंवा कसे याचा अभ्यास केला जाणार आहे.

या ठिकाणी होणार सिरोसर्वे

गणोरे (ता. अकोले), आंभोरे (ता. संगमनेर), रामपूरवाडी (ता. राहाता), सलाबतपूर (ता. नेवासा), ठाकूर पिंपळगाव (ता. शेवगाव), खंडाळा (ता. नगर), पारनेर (ता. पारनेर), बेलगाव (ता. कर्जत), कोपरगाव नगरपालिका वॉर्ड नंबर 11, अहमदनगर महानगरपालिका वॉर्ड नंबर 44 तसेच जिल्हा रुग्णालय येथील आरोग्य कर्मचारी आदी ठिकाणी हा सर्वे होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com