तीन वर्षाच्या जिल्हा शिक्षक पुरस्करांचे यंदा एकत्रित वितरण ?

43 शिक्षकांचे तर चार केंद्र प्रमुखांचे प्रस्ताव झेडपीला सादर
तीन वर्षाच्या जिल्हा शिक्षक पुरस्करांचे यंदा एकत्रित वितरण ?

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना दरवर्षी जिल्हा शिक्षक पुरस्कार देवून गौरवण्यात येते. मात्र, दोन वर्षापासून कोविडमुळे हे पुरस्कार रखडलेले होते. यामुळे यंदा मागील दोन वर्षाचे आणि चालू वर्षीचे असे एकत्रित तीन वर्षाच्या पुरस्कारांचे वितरण करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. दरम्यान, यंदाच्या पुरस्कारांसाठी 14 तालुक्यातून तीन या प्रमाणे 43 प्राथमिक शिक्षकांचे आणि चार केंंद्र प्रमखांचे प्रस्ताव जिल्हा परिषद शिक्षण विभागाला प्राप्त झालेले आहेत.

5 सप्टेंबरला शिक्षक दिनी प्रत्येक तालुक्यातून एक या प्रमाणे जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षक आणि एका केंद्र प्रमुखाला पुरस्कार देवून गौरवण्यात येते. यासाठी आधी तालुका स्तरावरून प्रत्येक तालुक्यातून तीन असे प्रस्ताव मागवण्यात येतात. मागवण्यात येणार्‍या प्रस्तावांची गटविकास अधिकार्‍यां मार्फत क्रॉस व्हेरिफीकेशन करण्यात येते. त्यानंतर जिल्हा परिषद पातळीवर या शिक्षकांची लेखी परीक्षा घेण्यात येते. शिक्षकांचे प्रस्ताव आणि लेखी परीक्षा एकत्र करून त्यानंतर मिळणार्‍या गुणांनूसार जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी संबंधीत शिक्षकांची निवड करण्यात येते.

यंदा या पुरस्कारसाठी प्रस्ताव आलेल्या शिक्षकांची लेखी परीक्षा 26 तारेखला घेण्याचे नियोजन आहे. ही परीक्षा झाल्यानंतर प्रत्येक तालुक्यातून सर्वाधिक गुण मिळवणार्‍या शिक्षकांची निवडण करून त्यांची पोलीस विभागाच्यावतीने चारित्र पडताळणी करून विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने या शिक्षकांच्या नावाची घोषणा करण्यात येते. त्यानंतर 5 सप्टेंबरला संबंधीत शिक्षकांचा गौरव करण्यात येतो. दोन वर्षापासून कोविडमुळे या पुरस्कारांचे वितरण झालेले नाही. यामुळे यंदाचे 14 आणि दोन वर्षातील 28 शिक्षक आणि तीन केंद्रप्रमुख अशांचा पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे.

नियोजनासाठी कमी वेळ

यंदाच्या शिक्षक पुरस्काराच्या नियोजनासाठी कालवधी कमी राहिला असून 26 तारखेला लेखी परीक्षा घेतल्यानंतर तातडीने संबंधीत शिक्षकांची चारित्र पडताळणी करून किमान 4 सप्टेंबरपर्यंत संबंधीत शिक्षकांच्या नावाची घोषणा करावी लागणार आहे. तसेच कार्यक्रमासाठी नियोजन करून मंगल कार्यालय आणि जेवणाची तयारी करावी लागणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com