
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
दरवर्षी देण्यात येणार्या तालुकानिहाय 14 जिल्हा शिक्षक पुरस्कारांची निवड झाली असून अंतिम मान्यतेसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठवण्यता आली आहे. 4 सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या पूर्व संध्येला जिल्हा शिक्षक पुरस्कारसाठी निवड झालेल्या प्राथमिक शिक्षकांची नावांच्या घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाच्या सुत्रांनी दिली. दरम्यान, यंदा देखील 5 सप्टेंबरच्या जिल्हा शिक्षक पुरस्कारांचा महुर्त हुकणार असून सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अथवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा शिक्षक पुरस्कारांचे वितरण होणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा शिक्षक पुरस्कारसाठी मागील पंधारवाड्यात प्राथमिक शिक्षकांची लेखी परीक्षा घेण्यात आलेल्यानंतर परीक्षा परीक्षे पात्र ठरलेल्या शिक्षकांच्या माहितीचे क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यात आले. त्यानंतर संबंधीत शिक्षकांना परीक्षेत मिळालेल्या गुणांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे पाठवण्यात आली होती. तालुकानिहाय मिळालेले गुण आणि लेखी परीक्षेत मिळालेल्या गुण यांची एकत्रित बेरीज केल्यानंतर प्रत्येक तालुक्यातून सर्वाधिक गुण मिळवलेल्या शिक्षकांची जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून अंतिम मान्यतेसाठी 14 शिक्षकांची नावे मान्यतेसाठी विभागीय महसूल आयुक्त यांना पाठवण्यात आली आहेत.
दरवर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने जिल्ह्यात चांगले काम करणार्या प्राथमिक शिक्षाकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार देवून गौरवण्यात येते. यासाठी प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे 14 शिक्षकांची निवड करण्यात येते. यासाठी संबंधीत शिक्षकांनी भरून दिलेल्या माहितीची क्रॉस पडताळणी करण्यात येते. या पुरस्कारासाठी शिक्षकांनी राबवलेले विविध उपक्रम, शैक्षणिक ब्लॉग, वेबसाईटची निर्मितीवर त्यावर केलेले लिखान, शैक्षणिक युटूब चॅनलची निर्मिती, वेगवेगळ्या पातळीवर प्रकाशीत केलेले विविध शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक सहल, इस्त्रोसहल, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढसाठी केलेले विविध प्रयोग, इंग्रजी माध्यमातून झेडपीच्या शाळेत विद्यार्थी येण्यासाठी केलेले प्रयोग यासह अन्य शैक्षणिक कामगिरी याचे मुल्यमान या पुरस्कारासाठी करण्यात येते.
यासाठी 100 गुण असून यासह 25 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. यात मिळालेल्या गुणांची गोपनिय यादी मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांच्याकडे पाठवण्यात आली होती. त्यांनी 14 शिक्षकांची जिल्हा शिक्षक पुरस्कारसाठी निवड केली असून मान्यतेसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठवलेली आहे. विभागीय आयुक्त यांच्या मान्यतेनंतर 4 सप्टेंबरला या पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.