जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांचे दुकानदारावर कारवाईचे आदेश

बालमटाकळी रेशन धान्य काळाबाजार प्रकरण
जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांचे दुकानदारावर कारवाईचे आदेश

बोधेगाव |प्रतिनिधी| Bodhegav

तालुक्यातील बालमटाकळी येथील स्वस्त धान्य दुकानातील धान्याची काळ्याबाजारात विक्री प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी शेवगावच्या तहसीलदार यांना तात्काळ कारवाई करून दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

बालमटाकळी येथील स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे स्वस्त धान्य दुकान मंगरूळ येथील शिवाजी शंकर काकडे हे चालवीत असून शनिवारी दुकानदाराने एम एच 16 सीए 0604 क्रमांकाच्या चारचाकी टेम्पो बोलावून त्यामध्ये रिकाम्या बारदाण्याचा बहाणा करून दुकानातील गहू-तांदुळाचे 50 किलो वजनाचे अनेक पोते टेम्पोत टाकून घेऊन जात असताना ग्रामस्थांनी सिनेस्टाईलने रंगेहाथ पकडला होता. ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांनी नायब तहसीलदार व पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना घटनास्थळी पाठवले होते.

अधिकार्‍यांनी भेट देऊन दुकानातील धान्य साठ्याचा पंचनामा केला होता. तर यावेळी पॉजमशीन बाहेर नोंदणीसाठी गेल्याचे सांगत दुकानदार काकडे यांनी अधिकार्‍यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नागरीकांनी दुकानाची तपासणी करत गोणीत लपचलेले पॉज मशिन त्यांना काढून दिले होते. अधिकार्‍यांनी हे मशिन ताब्यात घेतले आहे. या ठिकाणी मोठे रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या घटनेची दखल जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी घेऊन शेवगावच्या तहसीलदारांना सदर मंगरूळ येथील परवानाधारक स्वस्त धान्य दुकानदाराची चौकशी करून त्याविरोधात जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955मधील कलम 3 व 7 अन्वय तात्काळ कारवाई करून केलेल्या कारवाईचा अहवाल दोन दिवसांत सादर करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांत समाधान व्यक्त होत आहे. मात्र शेवगाव चे तहसीलदार व पुरवठा विभाग काय ठोस कारवाई करतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com