अखेर जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची बदली
सार्वमत

अखेर जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची बदली

शेखर पाटील नगरचे नवे क्रीडा अधिकारी

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची अखेर बदली झाली आहे. नवांदे या हिंगोलीच्या जिल्हा क्रीडा अधिकारी असणार आहेत, तर बुलढाण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांची नगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे गेल्या वर्षभरापासून जिल्हा क्रीडा अधिकारी विरोधात क्रीडा संघटना यांच्यात सुरू असलेला वाद आता शमणार आहे.

नगरला बदली होऊन आल्यापासून क्रीडा अधिकारी नावंदे यांचे निर्णय वादाच्या भोवर्‍यात होते. त्यांच्या निर्णयाविरोधात क्रीडा संघटनांनी असहकार आंदोलनही केले होते. या आंदोलनाची दखल थेट राज्य सरकारने घेतली होती. नावंदे यांची राज्य पातळीवरून तीन वेळा चौकशी समिती मार्फत चौकशी करण्यात आली होती. दरम्यान अवघ्या वर्षभरात नावंदे यांची बदली झाली असून यामुळे जिल्ह्यातील क्रीडा संघटनांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी यांची पदोन्नतीवर बदली झाल्यानंतर नावंदे यांना नगरमध्ये क्रीडा अधिकारी पदावर नियुक्ती मिळाली होती. नावंदे यांनी पदभार स्वीकारताच वाडिया पार्क मैदानावर मोठे बदल करणार असल्याची घोषणा केली. त्यानुसार त्यांनी वाडिया पार्क मैदानात प्रवेश शुल्क आकारण्यास सुरुवात करून फुकट्यांना प्रवेश बंद केला. याशिवाय मैदानात क्रीडा प्रशिक्षण देत असलेल्या क्रीडा संघटनांकडून शुल्क आकारणी सुरू केली. त्यामुळे क्रीडा संघटनांनी वाडिया पार्कमध्ये स्पर्धा घेणे बंद केले.

नावंदे यांच्या निर्णयाच्या भीतीने अनेक क्रीडा संघटनांनी स्पर्धा रद्द केल्या. नावंदे यांनी क्रीडा शिक्षकांवर व तालुका क्रीडा समित्यांवर पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धा बनविण्यासंदर्भात नवीन नियम तयार केले. या नियमांना कंटाळून क्रीडा संघटनांनी असहकाराचे हत्यार उपसले. या असहकार आंदोलनाची चर्चा राज्यभर झाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांनीही असहकाराचा पवित्रा घेतला होता.

त्यामुळे राज्य सरकारला नावंदे यांच्या चौकशीसाठी तीन वेळा समित्या नेमली. या समित्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अखेर नावंदे यांची बदली करण्यात आली. नावंदे यांनी काही दिवसापूर्वी महसूल विभागाच्या भूसंपादन विभागाचे कार्यालय वाडिया पार्क मधून स्थलांतरित करण्यास भाग पाडल्यामुळे महसूल प्रशासनातील काही अधिकारी नाराज होते.

नाशिकच्या निर्मल नगरच्या पुनर्वसन अधिकारी

जिल्ह्यातील महसूल विभागातील अधिकार्‍यांच्या नाशिक विभागातंर्गत बदल्या सुरू झाल्या आहेत. यात नाशिकच्या रोहयोच्या उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मल यांची नगरच्या जिल्हा पुनर्वसन अधिकारी पदावर बदली झाली आहे. तर विशेष भूसंपादन अधिकारी शाहुराव मोरे यांची नंदूरबार जिल्ह्यात उपजिल्हाधिकारीपदावर बदली झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com