‘माध्यमिक’च्या विरोधी संचालकांची निदर्शने

15 टक्के लाभांश मिळण्याची मागणी
‘माध्यमिक’च्या विरोधी संचालकांची निदर्शने

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या ऑनलाईन प्रणालीची चौकशी व लेखापरीक्षण अहवालाबाबत झालेल्या कार्यवाहीचा खुलासा करून त्याची प्रत मिळावी, सभासदांना 15 टक्के लाभांश मिळावा व इतर मागण्यांसाठी विरोधी संचालकांनी परिवर्तन मंडळाच्यावतीने जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

यामध्ये सोसायटीचे संचालक आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे यांच्यासह रमाकांत दरेकर, बद्रीनाथ शिंदे, नंदकुमार शितोळे, दिलीप बोठे, अभय जावळे, धोंडीभाऊ कोल्हे, बाळासाहेब निवडूंगे, प्रवीण उकिर्डे, पी. आर. बारगजे, मारुती लांडगे आदींसह सभासद सहभागी झाले होते. माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या ऑनलाईन संगणक प्रणालीच्या कामाच्या चौकशीसाठी विरोधी संचालक मागील दीड वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे.

याबाबत चौकशी पूर्ण झालेली आहेत. ऑनलाईनचे काम जवळपास 90 टक्के अपूर्ण असल्याचे लेखी पुरावे सादर करण्यात येऊन देखील, या कारवाई संदर्भात जिल्हा उपनिबंधक जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचा आरोप विरोधी संचालकांनी केला आहे. संगणक प्रणालीच्या कामाच्या चौकशीबाबत सविस्तर अहवाल जिल्हा उपनिबंधक कार्यालयास 15 दिवसांपूर्वी प्राप्त झालेला आहे. त्याप्रमाणे संबंधित ऑनलाईन प्रकरणाचा चौकशीचा अहवाल व त्याला अनुसरून कारवाईबाबत आदेशाची प्रत अद्याप तक्रारदार विरोधी संचालकांना मिळालेली नाही, असा आक्षेप यावेळी नोंदविण्यात आला.

Related Stories

No stories found.