अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणूका पारपडल्या आहेत. आता सरपंच आणि उपसरपंच निवडीचा कार्यक्रम मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जाहीर केला.

या कार्यक्रमानूसार जिल्ह्यातील 765 ग्रामपंचायतींवर 9 आणि 10 फेब्रुवारीला सरपंच आणि उपसरपंच यांची निवड करण्यात येणार आहे. कोविड नियमांचे काटेकोर पालन करून या निवडी पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात मुदत संपणार्या 767 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 15 जानेवारीला पारपडल्या. दरम्यान ग्रामविकास विभागाच्या 9 मार्च 2020 च्या आदेशानूसार ग्रामपंचायत सरपंच पद हे 2020 ते 2025 या कालावधीसाठी पाच वर्षासाठी आरक्षण काढण्यात आलेले आहे. त्यानूसार 22 जानेवारीला जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाच्या पुढील पाच वर्षाच्या सोडती काढण्यात आलेल्या आहेत.

या आरक्षणानूसार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये 9 आणि 10 फेब्रुवारीला सरपंच आणि उपसरपंच यांची निवड करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया राबवितांना संबंधीत आरक्षणाची खात्रीकरून सरंपच आणि उपसरपंच पदाची निवडणूक कार्यक्रम राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. यासह जामखेड तालुक्यातील वाकी आणि साकत सोडून उर्वरित 765 ग्राामपंचायतींच्या सरपंच यांची निवड यावेळी करण्यात येणार आहे.

असे होणार नवे सरपंच

अकोले 52, संगमनेर 94, कोपरगाव 29, राहाता 25, श्रीरामपूर 27, राहुरी 44, नेवासा 59, नगर 59, पाथर्डी 78, शेवगाव 48, जामखेड 47, पारनेर 88, श्रीगोंदा 59 असे आहेत.

नवनिर्वाचित सदस्यांच्या पळवापळवीला वेग

सरपंचपदाचे आरक्षण पूर्ण झाले. त्यानंतर आता सरपंच, उपसरपंच निवडणुकीची तारीख जाहीर झाल्याने नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्याची पळवापळवीला वेग आला आहे. जिल्ह्यात 765 ग्रामपंचायतींच्या या निवडीच्या पार्श्वभूमीवर खुल्या आणि ओबीसी वर्गाला सरपंचपद असलेल्या गावांत राजकीय डावपेचांना वेग आला आहे. ग्रामपंचायत आपल्या गटाच्या ताब्यात रहावी यासाठी जिल्ह्यातील नेतेही लक्ष घालून आहेत.