साडेतीन लाख हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या !

पावसामुळे पिकांना जीवदान : अकोल्यात भाताची लागवड रखडली
साडेतीन लाख हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दमदार सुरूवात केल्यानंतर साधारण 15 दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात पावसाने (District Rain) पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या खंडामुळे अडीच लाख हेक्टरवरील पेरण्या (Sowing) धोक्यात आल्या होत्या. मात्र, मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात मान्सून सक्रिय झाल्याने आधीच्या पेरण्यांना जीवदान मिळण्यासोबतच खरीप हंगामाच्या उर्वरित पेरण्यांना सुरूवात झाली आहे. यामुळे खरीपाच्या पेरण्याची आकडेवारी (Kharif sowing statistics) साडेतीन लाखांवर पोहचली आहे. अकोले तालुक्यात मात्र भात लागवडीचे प्रमाण कमी असल्याचे असून सुमारे 1 हजार 700 ते 800 हेक्टवर लागवड झाली असून त्याचे प्रमाण 12 टक्केच आहे.

यंदा दणक्यात वेळे आधी मान्सूनचे आगमन झाले. विशेष करून जिल्ह्याच्या दक्षिण भागात दमदार पावसाच्या हजेरीमुळे (Presence of heavy rains in the southern part of the district) कडधान्य पिकांची 324 टक्क्यांपर्यंत पेरणी गेली होती. मात्र, त्यानंतर पाऊस गायब झाल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळण्याची वेळ आली. पण गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात मान्सूनचे पुन्हा आगमन झाले असून जिल्ह्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस बरसत आहे. यामुळे आधीच्या पिकांना जीवदान मिळाले असून नव्याने पेरण्यांनी वेग धरला आहे.

मोसमी पाऊस 3 जूनला केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर त्याने अतिशय वेगाने प्रवास करीत तीनच दिवसांत महाराष्ट्र गाठला आणि पुढील चार ते पाच दिवसांत निम्म्या भारतात प्रगती केली होती. मात्र, त्यानंतर मोठा खंड पडल्याने शेतकरी चिंतेत होते. पाऊस सुरू झाल्याने काही प्रमाणात चिंता मिटली आहे. जिल्ह्यात आठ जुलैपर्यंत 3 लाख 40 हजार हेक्टवर सरासरीच्या 76 टक्के पेरण्या झाला असून रविवारअखेर साडेतीन लाखांच्या पुढे पेरण्या पूर्ण झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यात भाताची लागवडीची टक्केवारी 12 टक्के, बाजरीची 52 टक्के, मका 86 टक्के, तूर 218 टक्के, मूग 100 टक्के, उडिद 354 टक्के, भूईमूग 66 टक्के, तीळ 111 टक्के, सुर्यफूल 37 टक्के कापूस 43 टक्के लागवड झालेली आहे.

अशी झाली पेरणी (हेक्टर)

भात 1 हजार 700 ते 800, खरीप ज्वारी 66, बाजरी 72 हजार 677, नागली 195, मका 28 हजार 170, तूर 33 हजार 16, मूग 40 हजार 569, उडिद 62 हजार 318, भूईमूग 4 हजार 951, तीळ 111, कराळे 334, सुर्यफूल 135, सोयाबीन 40 हजार 333, कापूस 49 हजार 286, यासह स्वतंत्रपणे चारा पिके 36 हजार 325, कांदा 12 हजार 461, भाजीपाला पिके 9 हजार 728, मसाला पिके 299, फुलपिके 573, फळपिके 19 हजार 539 आणि उस लागवड 9 हजार 236 ऐवढी झालेली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com