एक, दोन कार्यकर्त्यांचा प्रवेश म्हणजे भगदाड नव्हे

सदिच्छाचे राजू शिंदे यांचा खुलासा
एक, दोन कार्यकर्त्यांचा प्रवेश म्हणजे भगदाड नव्हे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची रणधुमाळी जोरात सुरू असून निवडणूक प्रचारात सदिच्छा, बहुजन शिक्षक संघ, साजीर आणि महिला आघाडीने प्रचारात मुसंडी मारली आहे. जिल्हाभरातून सदिच्छाला प्रतिसाद मिळत असून विरोधकांच्या पाया खालील वाळू सरकली आहे. यामुळे विरोधक काही तालुक्यांत सदिच्छा मंडळाच्या एक, दोन कार्यकर्त्यांचा प्रवेश करून घेत सदिच्छाला खिंडार पाडल्याचा आव आणत दिशाभूल करत असल्याची टीका सदिच्छाचे नेते रवींद्र पिंपळे यांनी केले.

सत्ताधारी मंडळांनी आतापर्यंत सभासदांच्या हिताचा कारभार न करता गैरमार्गाने गट-तट पाडून आलटून पालटून सभासदांचा फसवण्याचा उद्योग केलेला आहे. सभासदांच्या ठेवीमधून परस्पर पैसे वर्ग करण्याचा सपाटाला लावला आहे. कायम ठेवीत परस्पर सभासद वर्गणी या नावाखाली प्रती सभासद 100 रुपये, विकास मंडळ बांधकामासाठी 10 हजार रुपये, मयत ठेव निधीतून प्रती सभासद 10 हजार रुपये, सभासदांच्या बचत खात्यातून परस्पर कर्ज खात्यात पैसे वर्ग करणे, जामीनदारांच्या खात्यावरून कर्जदाराच्या रक्कमा वर्ग केलेल्या आहेत.

सभासदांना झालेला हा मानसिक त्रास सभासद विसरलेले नाहीत. सत्ताधार्‍यांचे हे कृत्य निवडणूक प्रचारात सभासदांसमोर मांडणार आहोत. सत्ताधार्‍यांनी केलेले विविध घोटाळे सभासद विसरले नसल्याची टीका आबासाहेब जगताप, ज्ञानेश्वर माळवे, एकनाथ व्यवहारे, भास्कर फराळे, बाळासाहेब दांडगे, बाळासाहेब डमाळ, दादा वाघ, सतीश डावरे, बाबा आव्हाड, नवनाथ तोडमल, विनोद फलके, महादेव गांगर्डे, संजय पवार, चंदू मोढवे यांनी केली आहे.

सदिच्छा व गुरुकुल मंडळाला पाथर्डीत भगदाड

अनेकांचा गुरूमाऊली 2015 मंडळात जाहीर प्रवेश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाथर्डी तालुक्यामध्ये प्रचाराने वेग घेतला असून सदिच्छा मंडळासह गुरुकुल मंडळाला पाथर्डीत भगदाड पडले आहे. सत्ताधारी गुरुमाऊली मंडळाच्या नेते मंडळींनी पाथर्डीमध्ये येऊन सभासदांशी संवाद साधला आणि बँकेच्या झालेल्या कारभारावर व संघटनात्मक पातळीवर केलेल्या कामामुळे सभासदांनी पहिली पसंती गुरुमाऊली मंडळाला दिली असल्याचे सांगितले.

पाथर्डी तालुका सभासद सुसंवाद मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी गुरुमाऊलीचे कोषाध्यक्ष ना. ची. शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा संघाचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे, मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे, साहेबराव अनाप,सुयोग पवार, विजय नरवडे, विठ्ठलराव फुंदे, भाउसाहेब ढाकणे हे उपस्थित होते. यावेळी शिंदे यांनी गेल्या 30 वर्षांच्या इतिहासामध्ये बँकेमध्ये झालेला कारभार आणि संघटनात्मक काम यांचा लेखाजोखा सभासदांसमोर मांडला. यात गत 6 वर्षांच्या काळामध्ये झालेला कारभार आणि संघटनात्मक काम हे सभासद हिताचे आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचे या दोन्हीही बाबींचा प्रामुख्याने उल्लेख भाषणामध्ये केला. तांबे यांच्या नेतृत्वाने सर्वसामान्य सभासदांना व वाडी वस्तीवर काम करणार्‍या सर्वसामान्य शिक्षकाला सदैव न्याय देण्याचे काम केले आहे. यामुळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचं घेतलेलं धोरण सभासदांना आवडलेलं आहे. यावेळी संदीप काळे, ज्ञानदेव कराड, महेश लोखंडे, सुनील शिंदे, भास्कर दराडे यांची भाषणे झाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com