अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम पार पडली. ग्रामीण, शहरी व महापालिकाक्षेत्रामध्ये एकूण 4 लाख 9 हजार 565 बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला.

लसीकरणाची मोहीम 93 टक्के पूर्ण झाली आहे. ग्रामीण भागात मंगळवार, बुधवार, गुरूवार असे तीन दिवस लसीकरण सुरू राहणार आहे. शहरी भागात सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस ही मोहीम सुरू राहणार आहे. राहिलेल्या बालकांना डोस पाजण्याचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण होईल, असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी व्यक्त केला.

पल्स पोलिओ लसीकरणाकरिता जिल्ह्यामध्ये एकूण 4 लाख 40 हजार 287 बालकांना पोलिओ लसीचे डोस पाजण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रविवारी शून्य ते 5 वर्षे वयोगटातील ग्रामीण भागात 3 लाख 56 हजार 827 (94.56 टक्के), शहरी भागात 13 हजार 474 (80. 83) तर महापालिका क्षेत्रात 39 हजार 264 (84.88 टक्के) बालकांना पोलिओ डोस देण्यात आले.

या लसीकरणासाठी ग्रामीण भागात 3 हजार 521 बुथ, शहरी भागात 87 व महानगरपालिका क्षेत्रात 374 असे एकूण जिल्हयामध्ये 3 हजार 982 बुथवर एकूण 9 हजार 110 कर्मचार्यांमार्फत पोलिओ लसीचे डोस देण्याचे नियोजन आरोग्य यंत्रणेने केले होते. राज्यस्तरावरुन जिल्हयाकरीता 6 लाख 10 हजार पोलिओ लसीचे डोस प्राप्त झाले आहेत.