जिल्हा पोलीस दलात बदल्यांच्या हालचालींना वेग

पोलीस शिपाई ते सहाय्यक उपनिरीक्षकांच्या होणार बदल्या
जिल्हा पोलीस दलात बदल्यांच्या हालचालींना वेग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा पोलीस दलात पोलीस अंमलदारांच्या बदल्यांबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या गट संवर्गातील बदलीपात्र पोलीस अंमलदारांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. बदली पात्र पोलीस अंमलदारांनी तीन पसंतीची ठिकाणे नमूद करून तसा विनंती अर्ज प्रभारी अधिकारी यांचेकडे 25 मार्च, 2022 पर्यंत सादर करावा, असा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काढला आहे. आपल्या आवडीचे पोलीस ठाणे पदरात पाडून घेण्यासाठी पोलीस अंमलदारांच्या हालचालींना वेग आला आहे.

2022 मध्ये जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदलीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी निकष लागू केले आहेत. पोलीस अंमलदारांचा एका पोलीस ठाण्यातील कालावधी खंडित-अखंडित सेवा धरून पाच वर्षाचा राहील. एका तालुक्यात एका पेक्षा जास्त पोलीस ठाणे असेल त्या तालुक्यामधील कमाल कालावधी सर्व संवर्गातील खंडित अथवा अखंडित सेवा धरून 12 वर्षे राहील. स्वग्राम असलेल्या तालुक्यात बदली, नेमणूक देता येणार नाही. स्थानिक गुन्हे शाखा येथे पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी नेमणूक देता येणार नाही. या निकषाच्या अधीन राहून बदल्या केल्या जाणार आहेत.

वरील नमुद निकषानुसार ज्या पोलीस अंमलदारांचा विहीत कालावधी 31 मे, 2022 रोजी पूर्ण झाला आहे व ते बदली पात्र आहेत. त्यांनी वरील निकषाचे काळजीपूर्वक अवलोकन करण्याचे आदेश अधीक्षक पाटील यांनी दिले आहेत. दरम्यान, वर्षांनुवर्ष एकाच पोलीस ठाण्यात किंवा उपविभागात ठाण मांडून बसलेल्या पोलीस अंमलदारांची इतरत्र बदली करून त्याठिकाणी नवीन अंमलदारांना संधी दिली पाहिजे, अशी चर्चा जिल्हा पोलीस दलात आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

‘त्या’ अर्जाचा विचार होणार नाही

बदली पात्र पोलीस अंमलदारांकडे अर्ज मागितले आहे. काही पोलीस अंमलदार स्थानिक गुन्हे शाखेसह आपल्या आवडीचे पोलीस ठाणे पदरात पाडून घेण्यासाठी परस्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे अर्ज करतात, अशा अर्जाचा स्वीकार केला जाणार नसल्याचे अधीक्षक पाटील यांनी आदेशात नमुद केले आहे. जे पोलीस अंमलदार प्रभारी अधिकार्‍यामार्फत अर्ज सादर न करता परस्पर अर्ज पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर करतील अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही, याबाबत प्रभारी अधिकारी यांनी पोलीस अंमलदारांना लेखी समज देऊन त्यांची परिपत्राकावर स्वाक्षरी घ्यावी. प्रभारी अधिकारी यांनी बदलीपात्र पोलीस अंमलदारांचे अर्ज बंद लखोट्यात एकत्रितपणे सादर करावेत, असे स्पष्ट आदेश अधीक्षक पाटील यांनी दिले आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com