जिल्हा पोलीस दलात लवकरच खांदेपालट

एलसीबीसह पोलीस ठाण्यांना मिळणार नवे प्रभारी
जिल्हा पोलीस दलात लवकरच खांदेपालट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नाशिक परिक्षेत्रातील पोलीस अधिकार्‍यांच्या नुकताच बदल्या झाल्याने जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकार्‍यांच्याही येत्या दोन ते चार दिवसांमध्ये बदल्या केल्या जाणार आहेत. जवळपास सर्वच पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बदलले जाण्याची शक्यता असून मोठ्या प्रमाणात खांदेपालट होणार असल्याचे समजते.

विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहा.निरीक्षकांच्या नुकताच बदल्या केल्या. यामध्ये जिल्हा पोलीस दलातील एलसीबी निरीक्षकांसह चार निरीक्षक व दोन सहा. निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या आहेत. तर जिल्ह्यात नव्याने सात निरीक्षक, एक सहा. निरीक्षक मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वी पाच निरीक्षक जिल्ह्यात बदलून आले आहेत.

तर चार निरीक्षकांना पोलीस उपअधीक्षक पदावर पदोन्नती मिळणार आहे. अनेक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ देखील पूर्ण झाला आहे. यादृष्टीकोनातून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना जवळपास सर्वच पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांच्या बदल्या कराव्या लागणार आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांची जळगाव येथे बदली झाली आहे. त्यांच्याजागी आता कोण? याची चर्चा जिल्हा पोलीस दलात झडत आहे. लवकरच याठिकाणी नवीन प्रभारी अधिकारी येणार असल्याचे समजते. तसेच नगर शहरातील कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प, एमआयडीसी, नगर तालुका या पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बदलले जाणार आहेत.

जिल्ह्यातील कोपरगाव तालुका, घारगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जिल्ह्याबाहेर बदलून गेले आहेत. त्यांच्या जागी नव्याने अधिकारी द्यावे लागणार आहेत. पारनेर, शेवगाव, कर्जत, जामखेड, नेवासा, श्रीगोंदा, बेलवंडी, श्रीरामपूर शहर, श्रीरामपूर तालुका, संगमनेर शहर, संगमनेर तालुका, राहाता, कोपरगाव शहर आदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बदलले जाणार असल्याचे समजते.

दरम्यान ज्या पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांची बदली झाली व कार्यकाळ पूर्ण झाला आहे अशा ठिकाणी लवकरच नवीन प्रभारी अधिकारी दिले जाणार आहेत. इतर ठिकाणच्या प्रभारी अधिकार्‍यांची बदली एप्रिल, मे महिन्यात होण्याची शक्यता आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com